Manchar News : शरद बँकेची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा व फौजदारी गुन्हा दाखल करणार
esakal September 14, 2025 06:45 AM

मंचर - 'शरद सहकारी बँकेने ५२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. इतिहासात प्रथमच निव्वळ एन.पी.ए. प्रमाण शून्य टक्के झाले आहे. देशात एकूण एक हजार ५६० सहकारी बँका आहेत. रिझर्व बँकेच्या निकषानुसार शरद बँकेचा देशात ३७ क्रमांक आला आहे.

त्यामुळे या बँकेविषयी विनाकारण गैरसमज पसरविणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये. बँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.” असे शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी सांगितले.

मंचर (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता. १२) शरद बँकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत शहा बोलत होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संचालक अजय घुले व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख उपस्थित होते.

शहा म्हणाले, 'सन १९७४ मध्ये बँकेची स्थापना सहकार महर्षी माजी आमदार (स्व) दत्तात्रय वळसे पाटील यांनी केली. माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. राज्यात सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेत शरद बँकेचे काम प्रगतीपथावर आहे.

२९ हजार ८८४ सभासद असून खातेदारांची संख्या एक लाख ७९ हजार ४९९ आहे. बँकेच्या एकूण ठेवी एक हजार ८६६ कोटी १५ लाख रुपये असून कर्जवाटप एक हजार २५८ कोटी १२ लाख रुपये केले आहे. राज्यात बँकेच्या २७ शाखा आहेत.

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजनेचा व्याज परतावा बँकेच्या माध्यमातून ५५९ कर्जदारांना विविध उद्योग-धंद्यासाठी ७० कोटी १५ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. उद्योग-व्यवसायातून अनेकांना हक्काचा रोजगार मिळावा आहे.

तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत दोन जामीनदार घेवून विनातारण कर्ज दिले जाते. महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे महामंडळ, प्रधानमंत्री आवास योजना यांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील युवक-युवती व कारागिरांना अग्रप्रमाणे कर्ज पुरवठा करत आहेत.'

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.