Maharashtra Rain : मान्सून जाता जाता झोडपणार, महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता; येत्या २-३ दिवसात कसं असेल वातावरण?
esakal September 14, 2025 04:45 AM

मान्सूनचा परतीचा प्रवास १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून अंदाजे १७ सप्टेंबरला सुरू होईल. विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आला आहे.

बंगालच्या उपसागरात शुक्रवारी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय. हा कमी दाबाचा पट्टा पुढील दोन दिवसात ओडिशा आणि छत्तीसगढच्या दिशेनं सरकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.

Maharashtra Rain: महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढणार! पुढील आठवडाभर १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने मुंबईत रविवार आणि सोमवारी यलो अलर्ट जारी केलाय. तर पुण्यातही येत्या चार दिवसात हलक्या सरी कोसळतील असं हवामान विभागाने म्हटलंय. शुक्रवारी पुण्यात मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. मुंबई-पुण्याशिवाय ठाण्यालाही यलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

परतीचा प्रवास कसा ठऱतो?

मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधील वातावरणाच्या आधारे ठरतो. राजस्थानवर वातावरणाच्या खालच्या थऱात जास्त दाबाचं क्षेत्र तयार होताच सलग पाच दिवस कोरडं हवामान राहिले तर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचं जाहीर करण्यात येतं. यंदा नेहमीपेक्षा दोन दिवस आधीच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.