rat12p21.jpg
91048
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
---------
संधी मिळाली की, महिला त्याचं सोनं करणारच
वैदेही रानडेः प्रसंगी लहान मुलीला ठेवून लोकांना भेटावे लागे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : काम टाळणे ही एक वृत्ती आहे, ज्यात पुरुष व स्त्रिया दोघांचाही समावेश होतो. नोकरदार महिलांना खूप आव्हाने असतात; पण आपण समानता म्हटली की, आपल्याला काम टाळणे शक्य नसते. आपल्याला अधिकार, कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. एक महिला म्हणून माझ्या स्त्रीत्वाचा उपयोग माझ्या फायद्यासाठी न करणे हे जर तुम्ही पाळलं ना तर समानता चालत तुमच्याकडे येणारच. महिलेला संधी मिळाली की, ती त्याचं सोनं करणारच, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आयोजित महिला परिषदेत त्या बोलत होत्या. विधानसभा निवडणूक आणि भयानक पूरपरिस्थिती अशा प्रसंगावेळी माझी मुलगी लहान असतानाही मला लोकांना भेटायला जावे लागत होते. त्या वेळी माझी भूमिका मी उत्तमरितीने पार पाडली. त्यामुळे आजही तिथले लोक मला भेटतात आणि विचारपूस करतात, असा अनुभव त्यांनी सांगितला.
रानडे म्हणाल्या, महिलांना बाळंतपणासाठीची रजा मिळण्यासाठी १९६१ला कायदा झाला. त्यानुसार १२ आठवड्याची पगारी रजा मिळत होती; परंतु काहीवेळा महिलांचे वेगवेगळे प्रश्न असतात. त्या वेळी बाळाला घरी ठेवून नोकरीवर हजर होणे कठीण होते. त्यामुळे २०१७ मध्ये कायद्यात बदल झाला व जास्त रजा मिळू लागली आहे. महिला बचतगटांची मोठी चळवळ उभी राहिली व पापड, लोणची, मसाले यांसह अन्य उद्योगांतून महिला सक्षम होत आहेत. भारतात आतापर्यंत एक महिला पंतप्रधान, दोन राष्ट्रपती आणि १५ महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. आरक्षणामुळे पहिली महिला एमपीएससीची बॅच होती त्यात मी सुद्धा होते. १९९७ ला मी उपजिल्हाधिकारी झाले. आम्ही ९ जणी अधिकारी झालो. २००१ मध्ये आम्ही महिला अधिकाऱ्यांचा दबावगट केला. आम्ही मंत्र्यांना भेटलो. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, पती-पत्नी अधिकारी असल्यास किमान पदभार एकाच जिल्ह्यामध्ये मिळावा, असे मंजूर झाले.
चौकट १
रत्नागिरीला पार्श्वभूमी
स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक, आर्थिक विकास हे हातात हात घालूनच जात असतात. लिंग समानता ही आपल्या घरापासूनच सुरू व्हायला हवी. रत्नागिरी जिल्ह्यात साक्षरता ही पूर्वीपासूनच जास्त आहे. जिल्ह्याने पाच भारतरत्न दिले आहेत. त्यामुळे येथे चांगले काम उभे राहिले. महिला सरपंच असलेल्या गावांमध्ये समस्या समजून त्या सोडवण्याकडे कल दिसतो, असे रानडे यांनी सांगितले.