आशिया कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने खेळवण्यात आले आहेत. तर पाचव्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. बांगलादेशचा हा या स्पर्धेतील दुसरा आणि श्रीलंकेचा पहिला सामना असणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याचे वेध लागले आहेत. हा सामना रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्याला अवघे काही तास बाकी आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांचे क्रिकेट संघ आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला भारतीयांचा तीव्र विरोध आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणार्या पाकिस्तान विरुद्ध भारताने क्रिकेट सामना खेळू नये, अशा तीव्र भावना भारतीयांच्या आहेत. मात्र त्यानंतरही भारताच्या क्रीडा मंत्रालयाने या सामन्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र या सामन्याच्या तिकीट विक्रीवर मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यात 20 पेक्षा अधिक भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही देशातील संघर्ष वाढला. या हल्ल्यामुळे भारतीयांमध्ये पाकिस्तान विरुद्ध आधीपासूनच असलेली चीड आणखी वाढली. तेव्हापासून पाकिस्तान विरुद्ध कोणत्याही प्रकारे संबंध ठेवू नये, अशी भावना भारतीयांची होती. मात्र त्यानंतरही आशिया कप स्पर्धेसाठी दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं. तेव्हापासून या सामन्याला कडाडून विरोध केला जात आहे. विविध क्षेत्रातून हा सामना व्हायलाच नको, अशी भावना आहे. मात्र तीव्र विरोधानंतरही केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान सामन्याला हिरवा कंदील दाखवला. तसेच भारत-पाक सामन्यांबाबत धोरण जाहीर केलं. त्यानुसार, दोन्ही संघात द्विपक्षीय मालिका होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
“रोहित-विराट कारणीभूत”भारत-पाकिस्तान सामन्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये उपस्थिती लावतात. या महामुकाबल्याची तिकीटं मिळता मिळत नाही. या सामन्याच्या तिकीटासाठी चाहते वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. मात्र यावेळेस उलट चित्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या एसीसी अर्थात आशिया क्रिकेट परिषदेचं टेन्शन वाढलं आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्याची आतापर्यंत 50 टक्के तिकीटं विकली गेली नसल्याचं म्हटलं जात आहे. पहलगाम हल्ल्यामुळे हे चित्र असण्याची दाट शक्यता आहे. मात्र तिकीट विक्रीवर झालेल्या या परिणामाला 2 खेळाडू कारणीभूत असल्याचा दावा भारताचा माजी क्रिकेटर आकाश चोप्रा याने केला आहे. आकाश चोप्राने नक्की काय म्हटलंय? हे जाणून घेऊयात.
आकाश चोप्राचा दावा काय?आकाश चोप्रा याने केलेल्या दाव्यानुसार, भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री कमी होण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे कारणीभूत आहेत. विराट आणि रोहित चाहत्यांना आकर्षित करतात. हे दोघे नसल्याने स्पर्धेवर मोठा परिणाम झाल्याचं आकाशने म्हटलं. “विराट जेव्हा रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामना खेळण्यासाठी गेला तेव्हाही स्टेडियम जवळपास भरलेलं होतं. या खेळाडूंची अनुपस्थिती तिकीट विक्री कमी होण्यामागील कारण आहे”, असं आकाशने म्हटलं.
यंदा टी 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धेतील सामने होणार आहेत. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ही अनुभवी जोडी यंदा या स्पर्धेत नाही.
“रोहित आणि विराट दोघे जेव्हा खेळतात तेव्हा फरक पडतो. विराट-रोहित दोघे असते तर चाहत्यांची संख्या दुप्पटीने वाढली असती. आधी 5 हजार चाहते असते तर तोच आकडा रोहित-विराटमुळे किमान 10 ते 15 इतका झाला असता. क्रिकेट चाहत्यांना विराट आणि रोहितला सामन्याव्यतिरिक्त पाहण्याची संधी फार कमी मिळते. त्यामुळे या दोघांची अनुपस्थिति निर्णायक ठरते” असं आकाश चोप्रा याने नमूद केलं.