चास कमान येथील दळणावळणाला नवे बळ
esakal September 14, 2025 07:45 PM

चास, ता. १३ : चास-कमान धरणाच्या भिंतीला लागून समांतर असलेल्या पुलाच्या कामाचे लवकरच टेंडर होऊन डिसेंबर महिन्यापर्यंत पुलाचे काम सुरू होणार आहे. यामुळे धरणाच्या पलीकडे असणाऱ्या गावांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे, असे प्रतिपादन आमदार बाबाजी काळे यांनी केले.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमा नदीवर असलेले चास-कमान धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्याने आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते श्रीफळ व, पुष्प तसेच साडी-चोळी अर्पण करून धरणांतील पाण्याचे पूजन नुकतेच करण्यात आले. यावेळी उद्योजक संदीप घनवट, पप्पू राक्षे, शेतकरी सेनेचे एल. बी. तनपुरे, धरणाचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील, कार्यकारी अभियंता मोहन जाधवर, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, साहाय्यक अभियंता आश्विन पवार, अजय वाघमोडे, शुभम सुसुंद्रे, राजेंद्र राऊत यांसह धरण कर्मचारी उद्धव नाईकडे, तुळशीराम बोंबले, ज्ञानेश्र्वर कदम, सुधाकर तनपुरे, बाळासाहेब आनंदकर, रामदास तनपुरे, चासचे सरपंच विनायक मुळूक, जावेद इनामदार, गणेश मंडलिक, अरुण शिंदे, अजय दौंडकर, शरद जठार, कैलास नाईकडे, सुभाष कदम, रोहिदास नाईकडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार काळे म्हणाले की, चास कमान धरणाच्या भिंतीवरून मार्गस्थ होणारा मार्ग पूर्णपणे बंद करून नवीन पुलाच्या कामासाठी वेताळे मार्गाला जोडणारा पूलही लवकरच होणार आहे. वेताळे गावांसह कहू, कोयाळी, साकुर्डी, चिखलगाव, औदर गावांना याचा फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची असलेली पुलाची मागणी पूर्ण होणार आहे. पाणी हे जीवन असून जलसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन पाण्याच्या आवर्तनामध्ये समन्वय ठेवून धरणातील पाण्याचा थेंब थेंब शेतकऱ्यांसाठी कसा उपयोगात आणता येईल याचे नियोजन करणार असल्याचे असे त्यांनी स्पष्ट केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.