पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) २०२५’ ही परीक्षा २३ नोव्हेंबरला होणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व परीक्षा मंडळांच्या शाळांमध्ये शिक्षक सेवक आणि शिक्षक पदासाठी होणाऱ्या या पात्रता परीक्षेचे ऑनलाइन अर्ज येत्या सोमवारपासून (ता. १५) भरता येणार आहेत.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर एक) आणि इयत्ता सहावी ते आठवी (पेपर दोन) असे दोन पेपर घेतले जातात. राज्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे आणि सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षक पदावर नियुक्तीसाठी विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सूचना तसेच ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे आणि परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहिती https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून (ता. १५) सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना तीन ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. काही प्रशासकीय अडचणीमुळे या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थींसाठी अद्ययावत माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येईल, असे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले.
अर्ज भरण्याचा कालावधीऑनलाइन अर्ज : १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर
प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : १० ते २३ नोव्हेंबर
टीईटी परीक्षा : २३ नोव्हेंबर २०२५
पेपर एक : सकाळी १०.३० ते दुपारी १
पेपर दोन : दु. २.३० ते सायं.५
शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ आणि २०१९ मधील गैरप्रकारात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करणे, यापुढे होणाऱ्या परीक्षेत कायमस्वरूपी प्रतिबंधित विद्यार्थ्यांना ‘टीईटी २०२५’ या परीक्षेसाठी अर्ज भरता येणार नाही. दरम्यान, गैरप्रकाराच्या यादीत नाव समाविष्ट असूनही खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षा दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- अनुराधा ओक, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद