रवींद्र नाट्य मंदिरात राज्यस्तरीय सांस्कृतिक मेळावा रंगणार; ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती
esakal September 14, 2025 11:45 PM

रवींद्र नाट्य मंदिरात रंगणार राज्यस्तरीय सांस्कृतिक मेळावा
ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती
शिवडी, ता. १३ (बातमीदार) ः महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान २०२४ यांच्या वतीने राज्यस्तरीय कलावंत मेळावा आयोजित केला आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे रविवारी (ता. २१) या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्रभरातून विविध कला क्षेत्रांतील नामवंत व नवोदित कलावंत, संगीतज्ज्ञ, नर्तक, कलाकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र येणार आहेत.
सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, अभिनेते किरण माने यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कलावंत मेळाव्यात गणेश पूजन, सरस्वती पूजन आणि महामानव पूजन, कलावंतांचे सादरीकरण, भजन, गोंधळ, दशावतार, पोवाडे, लावणी, वाघ्या मुरळी, आदिवासी नृत्य, कोळीनृत्य यांसारखे रंगतदार कार्यक्रम, मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे, संस्थेच्या कार्याचा आढावा आणि कलावंतांचा गौरव सोहळा होणार आहे.
महाराष्ट्राची परंपरा आणि लोककला जपणे, कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नव्या पिढीला सांस्कृतिक वारसा समजावून सांगणे यामुळे महाराष्ट्राच्या कलावंतांसाठी हा कार्यक्रम एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे. सर्व रसिक, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक अध्यक्ष राजाराम शेलार यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.