Man Kills Over Wife Teasing : पत्नीवरून वारंवार चिडविल्याचा राग मनात धरून टोळक्याने पाठलाग करून महेश राजेंद्र राख (वय २३, रा. होळकरनगर, फुलेवाडी रिंगरोड) याचा निर्घृण खून केला. सख्ख्या भावांसह आठ ते दहा जणांनी एडका, तलवार, लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत महेशचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यापूर्वी याच टोळक्याने विश्वजित भागोजी फाले (वय १९, रा. गंधर्वनगरी, फुलेवाडी रिंगरोड) यालाही आपटेनगरात मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील सात संशयितांविरोधात करवीर पोलिस ठाणे व जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले.
याप्रकरणी मुख्य संशयित आदित्य शशिकांत गवळी (वय २३), सिद्धांत शशिकांत गवळी (२५, दोघे रा. दत्त कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड), धीरज राजेश शर्मा (रामानंदनगर), ऋषभ ऊर्फ मगर विजय साळोखे (२४, रा. रामानंदनगर), मयूर कांबळे (साने गुरुजी वसाहत), पियुष पाटील (नाना पाटीलनगर), सद्दाम सरदार कुंडले (२९, बी.डी. कामगार कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तर इतर साथीदारांची नावे निष्पन्न करण्याचे काम करवीर पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महेश राख व संशयित आरोपी हे एकेकाळी एकत्रच असायचे. मात्र, संशयित आदित्य गवळी याच्या पत्नीचे महेशसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने दोघांत वितुष्ट निर्माण झाले होते. दीड वर्षापासून आदित्य पत्नीपासून वेगळा राहत असून, त्यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. दोन दिवसांपूर्वीच हद्दपारी संपवून आलेला महेश राख याने आदित्यला पत्नीच्या कारणावरून पुन्हा डिवचल्याने दोघांत भांडण झाले होते.
आपटेनगरात मित्रावर हल्ला
आदित्य व सिद्धांत हे सख्खे भाऊ शुक्रवारी (ता. १२) रात्री टोळक्यासोबत फुलेवाडी रिंगरोडवरून फिरत होते. महेश राख याच्या काही मित्रांना धडा शिकवण्यासाठी बीअरच्या बाटल्या, दगड घेऊन त्यांनी हुल्लडबाजी सुरू केली. आपटेनगरातील एका बीअरशॉपीसमोर थांबलेल्या विश्वजित फाले याला टोळक्याने गाठले. त्याला बेदम मारहाण करत काचेच्या बाटल्या डोक्यात फोडल्याने तो गंभीर जखमी झाला.
रिंगरोडवर गॅंगवॉरची नवी दहशत
गवळी यांनी टोळक्यासोबत महेशचा मित्र ओंकार शिंदे याच्या घराला लक्ष्य केले. गंगाई लॉनच्या पिछाडीस त्याच्या घरासमोर जाऊन दगडफेक केली. बीअरच्या बाटल्या घरावर फेकल्याने कुटुंबीयांसह स्थानिकांची घाबरगुंडी उडाली. गल्लीत नेमके काय सुरू आहे, हे कोणालाच समजत नव्हते. हातात एडका, तलवारी, काठ्या, लोखंडी गज घेतलेल्या तरुणांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अनेकजण आपापल्या घरातून डोकावून पाहत होते. महेश राख तसेच हल्लेखोरही पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. या खुनामागे नवे ‘गॅंगवॉर’ फुलेवाडी रिंगरोडवर अनुभवण्यास मिळत आहे.
Kolhapur Crime Woman : गोड बोलून जवळ केलं, वारंवार आमिष दाखवलं अन्; कोल्हापूरच्या महिलेसोबत घडलं भयानकआमच्या घरात दंगा का?
दरम्यान, ओंकार शिंदे यांनी घराबाहेर येत या टोळक्याला ‘आमच्या घरासमोर का दंगा करताय’ अशी विचारणा केली. यावेळी संशयितांनी महेश राख कुठे आहे, त्याला बोलावून घे, असे धमकावले. काही वेळानंतर हे टोळके निघून जाताच ओंकारने घडलेला प्रकार फोनवरून महेश राख याला सांगितला. महेश तातडीने दुचाकीवरून ओंकारच्या घरात पोहोचला.
टोळक्याचा प्राणघातक हल्ला
महेश राख हा गंगाई लॉन परिसरातील ओंकारच्या घरात आल्याची माहिती या टोळक्याला मिळाली. आठ ते दहा जण हातात तलवार, एडका, लोखंडी गजासह महेशवर तुटून पडले. ओंकार शिंदेच्या घरापासून फरफटत नेत या टोळक्याने महेशवर सपासप वार केले. डोक्यात, चेहऱ्यावर, छातीवर वार झाल्याने तो रक्तबंबाळ झाला. लोखंडी गजाने त्याच्या पायांवर, हातावर झालेल्या मारहाणीमुळे महेश राख जागीच गतप्राण झाला.
वारंवार चिडवल्याने राग....
आदित्य हा त्याचा पत्नीसोबत घटस्फोट घेणार होता. ती सध्या महेशच्या घरी राहण्यासही गेली होती. घटस्फोटानंतर ती महेशसोबत लग्न करणार होती. परंतु, महेश वारंवार याच कारणावरून आदित्यला चिडवत होता. घटनेच्या दोन दिवसआधीही महेशने त्याला डिवचल्याने याचाच राग आदित्यच्या डोक्यात घर करून बसला होता. यातूनच त्याने महेशला संपविण्याचे मनात पक्के केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद
महेश राख हा फुलेवाडी रिंगरोडवरील गंगाई लॉन परिसरात आला. ओंकार शिंदे याच्या घरासमोर थांबला असताना गवळीसोबत आलेल्या टोळक्याने त्याला रस्त्यावर फरफटत नेले. चित्रपटालाही लाजवेल अशा आवेशात एडका, तलवार, लोखंडी गजाने झालेली मारहाण अंगावर काटा येईल अशी आहे. ही सर्व दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलिसांनी तपासकामी फुटेज ताब्यात घेतले आहे.
दोन दिवसांपूर्वीच हद्दपारी संपली
मृत महेश राख याच्याविरोधातही लक्ष्मीपुरी, करवीर पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारीच्या गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या महेशची हद्दपारीची मुदत बुधवारीच (ता १०) संपली होती. हद्दपारीची मुदत संपल्याच्या दोनच दिवसांनी त्याच्यावर हल्ला करून खून करण्यात आला.