अतिउच्च वीजवाहिनीशी मजुराचा संपर्क
नालासोपारा, ता. १३ (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पावरील एका मजुराचा अतिउच्च वीजवाहिनीशी संपर्क आल्याने गंभीर जखमी आहे. या मजुराची प्रकृती चिंताजनक असून वसई-विरार महापालिकेच्या नागीनदास पाडा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नालासोपारा पूर्व आचोळा येथे वसई-विरार महापालिकेचे मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू आहे. टंडन अर्बन सोल्युशन्स आणि ईगल इफ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून काम सुरू आहे. या कंपनीने मलनिस्सारणच्या जागेवरील खोदकाम करून माती काडून पालिकेच्या मालकीच्या बाजूच्या मोकळ्या जागेत मातीचा ढिगारा केला जात आहे. शनिवारी (ता. १३) सकाळी साडेअकरा वाजता एक मजूर ढिगाऱ्यावर गेला असता त्याचा वीजवाहिनीशी संपर्क झाला होता. भाजप महिला कार्यकर्त्या सुनीता तिवारी यांच्या कार्यकर्त्यांनी जखमीला पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे; मात्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे.