'झिरो पेंडेन्सी'चा निर्धार; नागरिकांना आधार
esakal September 14, 2025 07:45 PM

91212

‘झिरो पेंडेन्सी’चा निर्धार; नागरिकांना आधार

पालकमंत्री नीतेश राणे ः वेंगुर्लेतील जनता दरबारात अधिकाऱ्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १३ ः नागरिक प्रशासनाकडे येण्यापेक्षा प्रशासनच नागरिकांकडे आले पाहिजे. याकरिता वेंगुर्लेत जनता दरबाराचे आयोजन केले. जनतेला आपले प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी वारंवार यावे लागू नये, हा या मागचा उद्देश आहे. प्रत्येक तहसीलदाराने तालुक्यामध्ये तक्रारींची ‘झिरो पेंडेन्सी’ ही प्रक्रिया राबवावी, जेणेकरून आपल्याकडे येणारा कोणताही विषय, दाखल्यांचे विषय प्रलंबित असू नयेत. यामुळे जनतेचा शासनावर आणि अधिकाऱ्यांवर विश्वास वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
पालकमंत्री राणे यांनी काल (ता. १२) येथील तहसील कार्यालयामध्ये जनता दरबाराचे आयोजन करून सुमारे १३९ जणांचे प्रश्न समजून घेतले. संबंधित विभागाला तातडीने त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी प्रामुख्याने महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, महावितरण, नगरपालिका आदी विभागांच्या संबंधित जास्तीत जास्त प्रश्न नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडले. व्यासपीठावर माजी शिक्षण मंत्री, आमदार दीपक केसरकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, तहसीलदार ओंकार ओतारी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप तालुकाध्यक्ष विष्णू परब आदी उपस्थित होते. या जनता दरबारात बहुसंख्य जनतेने तक्रारी मांडल्या.
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘‘पालकमंत्री झाल्यावर मी जाहीर केले होते की, जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. पालकमंत्री असलो तरी जनतेचा सेवक आहे. ओरोस येथे सर्व शासकीय कार्यालये असल्याने वेंगुर्लेसह जे लांबचे तालुके आहेत, तेथील नागरिकांना आपल्या समस्यांसाठी ओरोसला प्रवास करून येणे खर्चिक असल्याची मला जाण आहे. या दृष्टीकोनातून हा जनता दरबाराचा प्रयत्न होता. आज वेंगुर्लेतून सुरुवात केली आहे. लवकरच इतर तालुक्यांमध्येही जाऊन जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे.’’
....................
जनता दरबारामुळे शासन जनतेपर्यंत
आमदार केसरकर म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांचा जनता दरबाराचा उपक्रम स्तुत्य आहे. त्यातून नागरिकांना थेट प्रशासनाकडे आपले प्रश्न घेऊन जाता येणार आहे. पालकमंत्र्यांच्या वेंगुर्लेतील जनता दरबाराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे.’’
....................
‘एम टू एम’ फेरीचा पुढील टप्पा वेंगुर्लेत
वेंगुर्ले बंदराच्या बाबतीत सर्व माहिती माझ्याकडे आहे. ‘एम टू एम’ फेरी आज आम्ही विजयदुर्गपर्यंत आणली आहे. याच्या पुढील टप्पा वेंगुर्लेतच आहे. या दृष्टीकोनातून येथील जेटीचे काम लवकरच दर्जेदार आणि समाधानकारक होईल. पुढच्या वेळी जेव्हा वेंगुर्लेत येईल, तेव्हा तहसीलदार कार्यालयातून केवळ अर्ध्या तासात निघालो पाहिजे, असे नियोजन प्रशासनाने करावे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.