सोमाटणे, ता. १३ ः शिक्षणाबरोबर व्यवसायाच्या नव्या वाटा या प्रशिक्षण उपक्रमातून साळुंब्रे येथील ग्रामप्रबोधिनी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वर्षाला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर शेतीपूरक व्यवसाय करून व्यावसायिक बनावे, त्यांना निर्मिती-विक्रीचे ज्ञान मिळावे यासाठी हा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी विद्यालयाचे सचिव व्यंकटराव भताने यांनी पुढाकार घेतला आहे. एनप्रो इंडस्ट्रीजच्या अलका करकरे व इनरव्हील क्लबच्या सोनाली जयंत यांचे त्यासाठी सहकार्य मिळत आहे.
शाळेत गांडूळ खत प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी दोन हजार किलो क्षमतेचा एक या प्रमाणे सहा बेड उभारण्यात आले आहेत. प्रत्येक बेडमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन हजार किलो शेण भरण्याचे काम पूर्ण केले असून त्यात दहा किलो गांडूळ सोडले जाईल. येत्या दोन महिन्यांत विघटनाची क्रिया पूर्ण होऊन गांडूळखताची निर्मिती होईल.
शेणासाठी वर्षाला ९० हजार, तर गांडुळांसाठी ६४ हजार असा एक लाख ५४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. ३६ टन गांडुळ खताची निर्मिती अपेक्षित आहे. टनाला तीस हजार रुपये या दराप्रमाणे शाळेला वर्षाला दहा लाख ८० हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यातून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उभारल्या जाणार आहेत.
---
गांडुळ खत निर्मिती, विक्री अशा सर्व क्रिया विद्यार्थी करणार आहेत. त्यांना शालेय वयातच शेतीपूरक व्यवसायाचे ज्ञान मिळणार आहे.
- गणेश भताने, प्रकल्प समन्वयक
---
व्यवसायास पूरक प्रशिक्षणामुळे आमच्या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहून शेतीपूरक व्यावसायिक बनू शकेल.
- राजेंद्र लासूरकर, मुख्याध्यापक
--------
फोटो
49003