Pachod Rainfall Damage: पाचोड पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस; पाच हजार हेक्टरवरील खरिपाचे मोठे नुकसान
esakal September 15, 2025 02:45 PM

पाचोड : वादळी वाऱ्यासह संततधार ढगफुटी सदृश्य पावसाने जोमदार हजेरी लावल्याने शेतशिवारजलमय होऊन खरिपाचे पिक भूईसपाट झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भितीने 'बळीराजा' पूर्णतः धास्तावल्याचे चित्र पाचोडसह पैठण तालुक्यात पाहवयास मिळते.

यासंबंधी पैठणच्या तहसिलदार ज्योति पवार यांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषीविभागाला तातडीने आपात्कालीन पंचनामे करण्याचे आदेश दिले असून तालुक्यातील पाच हजार हेक्टरावरील पिकांची मोठी हानी झाल्याचे समजते.

Rain: पांढरदेव, देऊळगाव राजा, मुळावा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग पिकांचे नुकसान, काही घरात शिरले पाणी

शनिवारी (ता.१३) दुपारपासून पैठण तालुक्यात उत्तरा नक्षत्राच्या जोमदार पावसाला वादळी वाऱ्यासह सुरुवात झाली. रविवार (ता.१४) पहाटे सहा वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. सलग पंधरा तास संततधार पावसामुळे सर्वत्र फळबागांसह अन्य पिके पाण्याखाली गेल्याने खरिपापाठोपाठ फळबागाही संकटात सापडून अतिवृष्टीने शेतकरीवर्ग नागवल्याचे व सततच्या पावसामुळे दगड मातीच्या घराची व शेतातील विहीरी ढासळल्याच्या मोठ्या घटना घडल्या.

हर्षी बु, हर्षी खुर्द, दादेगाव, थेरगाव, नांदर , रांजनगाव दांडगा, खेर्डा, नानेगाव, लिंबगाव, वडजी, आडगाव जावळे, कोळी बोडखा, मुरमा, सोनवाडी , खादगाव , कुतूबखेडा, सालवडगाव, खंडाळा, ज्ञानेश्वरवाडी आदी ठिकाणी पावसामुळे कापुस, तुर, बाजरी, मका व उसाचे पिक आडवे झाले. थेरगाव , हर्षी,मुरमा येथे घर व विहीरी ढासळल्या तर ज्ञानेश्वरवाडी येथील शेतकरी अंबादास थोटे यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कांदाचाळीत साठवून ठेवलेला अकरा टन कांदा पुरात वाहून गेला. एकंदरीत या पावसामुळे विहीरी तुडूंब भरल्या असून नदीनाल्यांना पुर आला. अख्खा पावसाळा आटोपता झाला तरी अद्यापपावेतो सर्व जलसाठे कोरडेठाक होती मात्र या पावसामुळे सर्व जलसाठे तृप्त झाले.

गेल्या सोळा-सतरा वर्षापासून दुष्काळाच्या गर्तेत रुतलेल्या पैठण तालुक्यावर गत चार वर्षापासून ओल्या दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. दुष्काळाच्या संकटातून सावरलेल्या फळबागा चार वर्षापासून अतिवृष्टीने कोमात गेल्या आहेत. पावसाचा जोर पुढे असाच कायम राहील्यास निम्मे खरिप गेले, आता रब्बीच्या पेरणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके वायाला जाऊन मेहनत - मशागतीचा खर्चही पदरी पडणार नसल्याचे चित्र पाहवयास मिळते.कोमात गेलेल्या बागा जगविण्यासाठी शेतकरी शर्थीचे प्रयत्न करीत आहे, जे गतवर्षीच्या संकटातून जगवले, ते बहरलेही अन् आता संततधार पावसामूळे ते उध्वस्त होत आहे. अलिकडे पंधरा दिवसाचा अपवाद सोडता दोन महिन्यापासून अधुन मधून होणाऱ्या पावसामुळे कापूस, तूर, मका,सोयाबीन, बाजरी पिकासह फळबागांत पाणी साचल्याने त्यांच्यात जगण्याची उमेद राहीली नाही. जमिन व पिकांची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपल्याने उभे पिके पिवळी पडून सुकून जात आहे.

सर्व शेतकरी, शेतमजुरांची भिस्त शेतीवर अवलंबुन असल्याने हे सर्व जण नागवले जाऊन परिसरातील अर्थ व्यवस्थाच कोलमडल्यागत झाली आहे. सखल भागातील पिके पाण्याखाली गेल्याने त्यांच्या हाती येणाऱ्या खरिपाच्या आशा मावळल्या असून रब्बीच्या पेरण्याचे चित्रही धुसर बनले आहे.संततधार पावसामुळे सर्व आंतरमशागतीचे कामे खोळंबून तणांनी डेरा जमविला आहे.त्यामुळे अनेकजण तणनाशक औषधाची फवारणी करत आहे. पिकं चांगली जोमात असतांनाच पावसाने पिके आडवी केली.

कापुस, तुर, मोसंबी, सोयाबीन, बाजरीच्या पिकांत पाणी साचून शेताला तलावाचे स्वरूप आल्याचे पाहवयास मिळते. एकेकाळी पाण्यासाठी आसुसलेले शेतशिवार साठलेल्या पाण्यामूळे संकटात सापडले आहे, हे पाणी पिकांच्या जिवावर उठल्याने शेतकऱ्यांवर दारिद्रयाचे संकट उभे ठाकण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर जुने दगड मातीच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर येत आहे, बहुतांश लोक आपल्या घरावर प्लॅस्टिक पेपर टाकून तूर्तास घरे वाचविण्याचे प्रयत्न करत आहे, काहींनी घरास लाकडी टेकू लावून वेळ मारून नेण्याचे धोरण अवलंबिले आहे.

Manipur: मैतेई समुदायातील न्यायाधीशांना कुकीबहुल भागात जाण्यापासून रोखण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी

संजय निंबाळकर, अनिल हजारे,नारायण आगळे , कृष्णा आगळे, बंडु चिडे, प्रकाश भांड , बाबुतात्या गोजरे, भाऊसाहेब गोजरे , कमलाकर एडके आदींनी तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. पाचोड (ता.पैठण): १)संततधार पावसामुळे मोसंबीच्या बागांत पाणी साचले,२) पाणी साचल्याने कापसाचे पिक संकटात सापडले ३) घराची पडझड झाली. ४ ) उसाचे पिक आडवे झाले.५) साठवलेला कांदा वाहुन गेला .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.