गुजरातमध्ये ऑगस्ट 2024 मध्ये अभूतपूर्व पाऊस झाला. फक्त वडोदऱ्यातच एका दिवसात तब्बल 26 सें.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती येऊन लोकांना विस्थापित व्हावे लागले आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. या आपत्तीनंतर अनेक घरमालकांना कटू अनुभव आला की त्यांच्या घराच्या विमा पॉलिसीत पुरामुळे झालेले घराचे व घरातील वस्तूंचे नुकसान यांचे कव्हरच नव्हते.
ही एकटी-दुकटी उदाहरणे नाहीत. हवामानातील वाढती अनिश्चितता आणि शहरी भागातील मालमत्तेची वाढती किंमत यामुळे लोकांना वाटणारे कव्हरेज आणि प्रत्यक्षात विमा देणारे कव्हरेज यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होत आहे. विमा संरक्षण घ्यायची इच्छा असली तरी, बहुसंख्य लोक नकळत अशा चुकांमध्ये अडकतात आणि त्यामुळे गरजेचा क्षण येतो, तेव्हा त्यांचा विमा उपयोगी ठरत नाही.
घराचा विमा घेताना सर्वसाधारणपणे केल्या जाणाऱ्या पाच मोठ्या चुका आणि त्यांना टाळण्याचे मार्ग खालीलप्रमाणे दिले आहेत.
1. पॉलिसी कालबाह्य होऊ देणे किंवा घरात बदल झाल्यावर पॉलिसी अद्ययावत न करणे
घरकर्ज घेताना एकदाच घर विमा घेतला आणि मग तो विसरून गेले, असे बऱ्याच जणांच्या बाबतीत होते. हप्ते वेळेवर भरले नाहीत तर पॉलिसी नकळत संपते, आणि मग अनपेक्षित प्रसंग उभा राहिल्यावर ग्राहक पूर्णपणे असुरक्षित असतात. पॉलिसी सुरु असली तरी ती जुनाट असू शकते. भारतात अनेक घरमालक घराचे नूतनीकरण करतात, मॉड्युलर किचन लावतात, कपाटे बसवतात, नवी इलेक्ट्रॉनिक साधने आणतात किंवा स्टडी रूमचे ऑफिसमध्ये रूपांतर करतात; पण विमा पॉलिसीत हे बदल दाखवायचे राहून जाते. अशावेळी विम्याचा दावा करायचा प्रसंग आला तर या सुधारणा किंवा नव्या वस्तू कव्हरच होत नाहीत. त्यामुळे नूतनीकरण, मौल्यवान वस्तूंची भर किंवा घराचा वापर बदलल्यावर पॉलिसी तपासणे आणि वेळेवर नूतनीकरण करणे महत्त्वाचे असते. केवळ अद्ययावत व सुरू असलेली पॉलिसीच अशा वेळी मदत करू शकते.
2. भाड्याच्या घरांसाठी किंवा अतिरिक्त राहण्याच्या खर्चासाठी कव्हरेज न घेणे
अनेक लोक भाड्याच्या घरात राहतात किंवा स्वतःचे घर भाड्याने देतात; पण अशा स्थितीत विमा कसा उपयोगी पडतो, याकडे त्यांचे लक्ष जात नाही. जर एखाद्या दुर्घटनेत (उदा. आग किंवा पूर) तुमचे भाड्याचे घर खराब झाले किंवा राहण्यायोग्य उरले नाही, तर तुम्ही कुठे जाणार? साधारण पॉलिसीत पर्यायी निवासाचा खर्च किंवा भाड्याचे नुकसान समाविष्ट नसते. तशी तरतूद मुद्दाम करून घ्यावी लागते. घरमालकांसाठी तर दुरुस्तीच्या काळात भाड्याचा तोटा हा मोठा आर्थिक धक्का असतो. त्यामुळे पॉलिसी घेताना अतिरिक्त राहण्याचा खर्च किंवा भाड्याचे नुकसान यांचे कव्हर आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. हा छोटा तपशील आपत्कालीन वेळी मोठ्या आर्थिक संकटातून वाचवू शकतो.
3. फक्त घराच्या रचनेवर लक्ष केंद्रित करणे आणि आतल्या वस्तूंकडे दुर्लक्ष करणे
घराचा विमा म्हणजे केवळ भिंती व छपरासाठीचे संरक्षण नव्हे, तर घरातील वस्तूंचे रक्षणसुद्धा त्यात अध्याह्त आहे. बरेच लोक असे समजतात की इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, दागदागिने आणि वैयक्तिक वस्तू यांचे कवच आपोआप मिळते, म्हणून त्यांसाठी वेगळे विमा घ्यायची गरज नाही. पण प्रत्यक्षात बहुतांश मूलभूत पॉलिसींमध्ये अशा मौल्यवान वस्तूंसाठी कव्हरेज अपुरे असते, किंबहुना नसतेच. संपूर्ण संरक्षणासाठी, आपल्या घरातील वस्तूंची किंमत अंदाजे ठरवून ती पॉलिसीत समाविष्ट करणे आवश्यक आहे. उच्च किमतीच्या वस्तू (उदा. कलात्मक वस्तू, महागडी गॅझेट्स) यांसाठी स्वतंत्र यादी नमूद करणे किंवा विशेष अॅड-ऑन कव्हर घ्यावे लागते का, हे तपासणे गरजेचे आहे. एक परिपूर्ण पॉलिसी ही घराची एकूण किंमत – रचना आणि आतील वस्तू – या दोन्ही बाबी दर्शवणारी असावी.
4. दाव्याची निकाली काढण्याची प्रक्रिया व प्रमाण न तपासणे
बहुसंख्य लोक फक्त प्रीमियम किती आहे याकडे पाहतात, पण विमा कंपनी दावे किती विश्वासार्हपणे निकाली काढते याकडे दुर्लक्ष करतात. ज्यांची दावा निकाली काढण्याची प्रक्रिया संथ आहे किंवा ज्या कंपनीचे रेकॉर्डच वाईट आहे, अशा विमा कंपन्यामुळे आपत्कालीन प्रसंगी अनावश्यक ताण निर्माण होतो. उदाहरणार्थ, आग किंवा पुरामुळे घराचे नुकसान झाले, तर त्वरित आणि सोयीस्कर दावा प्रक्रिया ही आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी अत्यावश्यक ठरते. त्यामुळे विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो (म्हणजे केलेल्या दाव्यांपैकी किती मंजूर केले) आणि ग्राहकांचे अनुभव हे आधी तपासले पाहिजेत. चांगले रेकॉर्ड असलेल्या कंपनीची निवड केल्यास गरजेच्या वेळी खरी मदत मिळते.
5. कव्हरेज न पाहता फक्त स्वस्त पॉलिसी निवडणे
अनेक खरेदीदार फक्त प्रीमियम कमी असल्यामुळे एखादी पॉलिसी निवडतात. पण हा दृष्टीकोन चुकीचा ठरू शकतो. स्वस्त पॉलिसीत कव्हरेज अपुरे असू शकते, भरपूर डिडक्टिबल्स (स्वतः भरायची रक्कम) असू शकतात किंवा जोखमीचे महत्त्वाचे मुद्देच वगळलेले असू शकतात. त्यामुळे विमा घेण्याचा त्यांचा मूळ हेतूच फोल ठरतो. किंमतीवरच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा कव्हरेजची गुणवत्ता, विमा कंपनीची विश्वासार्हता आणि दाव्याची प्रक्रिया किती सोपी आहे यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कधी कधी थोडा जास्त प्रीमियम भरल्याने अर्धवट भरपाईऐवजी संपूर्ण भरपाई मिळून मानसिक समाधानही मिळू शकते.
तुमचे घर ही तुमची एक मौल्यवान संपत्ती आहे – भावनिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनातून. त्याचा विमा घेणे म्हणजे फक्त औपचारिकता पूर्ण करणे नाही, तर दीर्घकालीन संरक्षण सुनिश्चित करणे आहे. वर नमूद केलेल्या पाच सर्वसाधारण चुका टाळून, आणि योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेऊन, आपली विमा पॉलिसी गरजेच्या वेळी पाठीशी उभी राहील, याची खातरजमा करून घ्या.
एसबीआय जनरल इन्शुरन्सचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर उदयन जोशी यांचा लेख