टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात झालीय. या स्पर्धेतील एकूण 8 संघांनी आतापर्यंत किमान 1 आणि जास्तीत जास्त 2 सामने खेळले आहेत. त्यामुळे या संघांमध्ये सुपर 4 साठी चुरस पाहायला मिळत आहे. ए ग्रुपमधील सुपर 4 साठी चित्र जवळपास स्पष्ट झाल्यात जमा आहे. भारतीय संघाने सलग 2 सामने जिंकत सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. तर उर्वरित एका स्थानासाठी यूएई आणि पाकिस्तान यांच्यात चुरस आहे. तर दुसर्या बाजूला बी ग्रुपमधून हाँगकाँग संघ बाहेर झाला आहे. त्यामुळे 2 जागांसाठी बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या 3 संघांमध्ये चढाओढ आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट टीम या मोहिमेत आपली सुरुवात विजयाने केली. अफगाणिस्तानने 9 सप्टेंबरला हाँगकाँगवर 94 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तान दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 16 सप्टेंबरला होणार आहे. मात्र या सामन्याच्या काही तासांआधी अफगाणिस्तानला मोठा झटका लागला आहे. अफगाणिस्तानच्या मॅचविनर खेळाडूला दुखापतीमुळे उर्वरित आशिया कप स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे सुपर 4 आधी अफगाणिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक दुखापतीमुळे उर्वरित आशिया कप स्पर्धेचा भाग नसेल. नवीन उल हक याला खांद्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळता येणार नसल्याची माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे. तसेच अफगाणिस्तानने नवीनच्या जागी बदली खेळाडूचा मुख्य संघात समावेश केल्याची माहिती दिली आहे.
नवीन खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे फिट होऊ शकला नाही. त्यामुळे मेडीकल टीमने नवीनला उर्वरित स्पर्धेसाठी अनफीट असल्याचं जाहीर केलं, अशी माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली. नवीनला या दुखापतीमुळे हाँगकाँग विरुद्धही संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे नवीनवर एकही सामना न खेळता या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. नवीनने अखेरचा टी 20i सामना हा डिसेंबर 2024 मध्ये खेळला होता.
दरम्यान नवीनच्या जागी संघात फक्त एकमेव सामना खेळलेल्या 22 वर्षीय गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज अब्दुल्ला अहमदझाई याचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे. अब्दुल्ला याला स्पर्धेसाठी राखीव म्हणून समावेश करण्यात आला होता.
अब्दुल्ला याने अवघ्या काही दिवसांपू्र्वी टी 20i ट्राय सीरिजमधून पदार्पण केलं होतं. अब्दुल्लाने 5 सप्टेंबरला यूएई विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. अब्दुल्लाने त्या सामन्यात एकमेव विकेट घेतली होती. आता अब्दुल्ला याला आशिया कप स्पर्धेत आपला पहिला सामना खेळण्याची प्रतिक्षा असणार आहे.