जर तसं झालं नाही तर….! आशिया कप स्पर्धेत पुढचे सामने खेळणार नाही, पाकिस्तानचा निर्णय
GH News September 16, 2025 12:17 AM

आशिया कप 2025 स्पर्धेतल्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानच्या चिंध्या उडवल्या. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तान 7 गडी आणि 25 चेंडू राखून धुव्वा उडवला. त्यात सामन्याआधी आणि सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्याने होती नव्हती ती सगळी लाज गेली. सामन्यानंतर पाकिस्तानी व्यवस्थापकाने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे तक्रार केली होती. आता हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे गेलं आहे. या तक्रारीत ज्यांच्याकडे सुरुवातीला तक्रार केली त्या अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. जर सामनाधिकाऱ्यांना काढलं नाही तर स्पर्धेतील इतर सामन्यांवर बहिष्कार टाकू असं स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आरोप केला की, पायक्रॉफ्टने नाणेफेकीवेळी दोन्ही संघांच्या कर्णधारांना स्पष्ट सांगितलं होतं की हस्तांदोलन करायचं नाही. याच मुद्द्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दाद मागण्यासाठी आयसीसीच्या दारात गेलं आहे. या स्पर्धेतून सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. इतकंच काय तर त्यांना काढलं नाही तर या स्पर्धेतील इतर सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. जिथे सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांची नियुक्ती असेल. दुसरीकडे, आयसीसीने पीसीबीच्या तक्रारीवर काहीच उत्तर दिलं नाही. इतकंच काय तर कारवाई देखील केली नाही.

दरम्यान, ही स्पर्धा आशियाई क्रिकेट परिषदेची आहे. त्यामुळे या स्पर्धेत आयसीसीचा कोणतीही भूमिका नाही. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जा प्राप्त स्पर्धा असल्याने सामनाधिकाऱ्यांची नियुक्ती आयसीसी करते. आशिया कप 2025 स्पर्धेसाठी आयसीसीने दोन सामनाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात पायक्रॉफ्ट आणि वेस्ट इंडिजचे रिची रिचर्डसन आहेत. पाकिस्तानचा पुढचा सामना 17 सप्टेंबरला युएईविरुद्ध होणार आहे. या सामन्यात सामनाधिकाऱ्याची भूमिका पायक्रॉफ्ट बजावणार आहेत. जर पायक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई केली नाही तर पाकिस्तानचा संघ पुढचा सामना खेळणार नाही.  हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान संघ खेळला नाही तर स्पर्धेतून आऊट होईल. कारण सुपर 4 फेरीत जागा मिळवण्यासाठी हा सामना जिंकणं भाग आहे. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.