पुणे, ता. १५ : शहर आणि जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी पहाटे तीन वाजता थेऊर गावातील रूपे वस्ती परिसरातील ओढ्याला पूर आल्याने त्यामध्ये अडकलेल्या ७० ग्रामस्थांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व पीडीआरएफ पथकातील जवानांनी मदतकार्य करून सुखरूप बाहेर काढले.
हवेली तालुक्यातील थेऊर गावातील रूपे वस्ती परिसरात ओढ्याला पूर आल्याने जवळपास १५० लोकांच्या वस्तीत सोमवारी पहाटे तीन वाजता पाणी शिरले होते. या घटनेची माहिती मिळताच प्राधिकरणाच्या वाघोली अग्निशमन केंद्रातील जवान आणि पीडीआरएफ पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून घरांमध्ये अडकलेल्या सुमारे ७० पेक्षा अधिक ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
या पुरामध्ये म्हशी, शेळ्या, कोंबड्या हे पाळीव प्राणी काही प्रमाणात वाचविण्यात यश आले, तर काही वाहून गेले आणि काहींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, जीवितहानी झाली नाही, अशी माहिती प्राधिकरणाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर भाले यांनी दिली.