पुणे - नुकताच होऊन गेलेला गणेशोत्सव व त्या गर्दीमध्ये एकमेकांना झालेल्या श्वसन संसर्गाची देवाण – घेवाण, पावसाळ्यात वाढणारा विषाणूजन्य संसर्ग, प्रदूषण आदी कारणांमुळे मुलांमध्ये सध्या न्यूमोनिया हा श्वसन संसर्ग वाढलेला आहे.
या न्युमोनियाला ‘रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस’ (आरएसव्ही) सर्वाधिक कारणीभूत ठरत असून बालकांना ताप येणे, त्याचबरोबर सर्दी खोकला, धाप लागणे अशी लक्षणे सध्या दिसून येत आहेत. बालकांमधील न्युमोनियाची रूग्णसंख्या तर दुप्पट ती तिपटीने वाढल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ देतात.
पुण्यातील खासगी तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये बालरोग विभागात बालकांची व पालकांची गर्दी वाढली आहे. बालरोगतज्ज्ञांच्या मते, मुलांची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असल्याने न्यूमोनिया श्वसनमार्गावर परिणाम करतो. वेळेत उपचार न घेतल्यास हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो. यामध्ये काही रुग्णांमध्ये ताप, खोकला, अंगदुखी, थकवा ही लक्षणे दिसतात.
हलक्या स्वरूपाच्या रुग्णांना प्रतिजैविकांनी आणि विश्रांतीने आराम मिळतो; परंतु गंभीर अवस्थेत फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने श्वास घेण्यास त्रास होतो आणि ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे गेल्या काही दिवसांसाठी ऑक्सिजन बेडची मागणी देखील वाढली आहे. अनेक मुलांना गरज पडत असल्याने त्यांना दुसरीकडे उपचारासाठी पाठवावे लागत असल्याची माहिती महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता सांगडे यांनी दिली.
डॉ. सांगडे म्हणाल्या, ‘पाच वर्षांच्या आतील बालकांमध्ये तीन ते चार पटीने न्यूमोनिया वाढला आहे. काही मुले बाह्यरुग्ण विभागातील उपचारांनी बरे होतात तर काहींना मात्र, ऑक्सिजन बेडची गरज पडत आहे. तसेच एकूणच मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी रुग्णालयात दररोज ७० ते ८० बालके यायचे ते प्रमाण आता शंभर ते दीडशेवर गेले आहे.’
'मुलांमध्ये श्वसनविषयक आजारांमध्ये वाढ झाली आहे. दरवर्षी या काळात ही वाढ होत असते. त्यामध्ये वेगळे काही कारण दिसून येत नाही. सध्या ‘आरसव्ही’ हा विषाणूमुळे संसर्ग बालकांमध्ये दिसून येत आहे. गणेशोत्सवामध्ये गर्दीमध्ये गेल्याने हा उत्सव संपल्यावर सर्वसाधारणपणे या प्रकारच्या आजारपणात दरवर्षीप्रमाणे थोडीशी वाढ दिसून येत असते. रुग्णालयात नेहमीच्या तुलनेत न्युमोनियाच्या बालरुग्णांची संख्या ही बाह्यरुग्ण विभाग, बालअतिदक्षता कक्षात तसेच वॉर्ड मध्येही वाढलेली आहे.’
- डॉ. आरती किणीकर, विभागप्रमुख, बालरोग विभाग, ससून रुग्णालय
ही दिसत आहेत लक्षणे -
– थंडी, ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास, शरीरातील ऑक्सिजन कमी होणे
– बाळ सुस्त होणे, जेवण कमी करणे, दूध कमी पिणे
– गंभीर अवस्थेत फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने श्वास घेण्यास त्रास होणे
काय काळजी घ्याल?
– मुलांचे लसीकरण करा, खासकरून फ्लू ची लस घ्या त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहण्यास मदत
– घरात कोणी आजारी असेल तर मुलांना त्यांच्याजवळ जाऊन देऊ नका, घरात स्वच्छता बाळगा
– थंड हवेपासून बचाव करा, संतुलित आहार, थंड खाऊ नका, पुरेशी झोप घ्या
– शाळेत जाणा–या मुलांना मास्क लावा, पाणी उकळून प्या
– लक्षणे दिसल्यास त्वरित बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या