Rescue Operation: कोंबडीच्या मोहात; बिबट्या खुराड्यात, पेडजवळ थरार; वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन, परिसरात भीती
esakal September 16, 2025 08:45 AM

पेड: डोंगराच्या रांगेत गाव... रात्री दहाची वेळ होती... किर्रर शांतता... तो दबक्या पावलांनी गावात आला... कोंबड्यांनी भरलेल्या खुराड्यात घुसला आणि तुटून पडला... भरपेट ताव मारून पुन्हा निघून जाताना खुराड्यातच अडकला... अन् काही केल्या निघता येईना. मग सर्वत्र खळबळ उडाली. वनविभाग दाखल झाला... रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर निसर्गात मुक्त करण्यात आले. पेड (ता. तासगाव) येथे घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासा

पेड (ता. तासगाव) पासून तीन ते साडेतीन किलोमीटरवर विठ्ठलनगर आहे. या वस्तीभागाला लागून डोंगर रांग आहे. तेथे शिवाजी बापूसाहेब शेंडगे यांच्या घरासमोर शनिवारी रात्री दहाच्यासुमारास बिबट्या आला. तो थेट कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला. त्याने जवळपास वीस कोंबड्या फस्त केल्या. खुराड्यातून बाहेर पडतानाच अचानक दरवाजा बंद झाल्याने तो चारी बाजूंनी बंदिस्त जाळीत अडकला आणि त्याच ठिकाणी निवांत बसला. ही माहिती तासगाव पोलिसांना तसेच वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी धावले. कोंबड्यांच्या खुराड्यात अडकलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने पहाटे दोनच्या दरम्यान जेरबंद केले.

पेडमध्ये बिबट्या आल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली होती. ही कारवाई सांगलीचे उपवन संरक्षक सागर गौटे, सहा वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विट्याचे वनविभागाचे आर.एफ.ओ विलास पोवळे, पेडचे वनपाल जयसिंग महाडिक, वनरक्षक सुनील पवार, वनरक्षक थापरकर, वनरक्षक दगडू क्षीरसागर, प्राणीमित्र युनूस मणेर, प्राणीमित्र भिंगारदिवे, सर्पमित्र ओंकार शेळके, प्रताप भाट, दीपक कणसे आदींच्या सहकार्याने करण्यात आली.


वनविभागाने जेरबंद केलेला बिबट्या हा नर जातीचा असून, तो साडेतीन ते चार वर्षांचा आहे. त्याची पूर्ण वाढ झाली असून, तो सुदृढ आहे. त्याच्या अंगाला कोणतीही जखम नाही. त्याची वैद्यकीय तपासणी करून निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करण्यात येणार आहे.

- जयसिंग महाडिक, वनपाल, पेड

अन् खुराड्याचा दरवाजा उघडा राहिला

शिवाजी शेंडगे यांनी कोंबड्यांसाठी तारेचे कंपाउंड मारून रात्रीच्यावेळी कोंबड्यांसाठी खुराडे तयार केले आहे. कोंबड्या बसल्यानंतर दररोज खुराड्याचा दरवाजा बंद केला जातो. मात्र, शनिवारी रात्री नजरचुकीने दरवाजा बंद करायचा राहून गेला आणि नेमका त्याच दिवशी बिबट्या कोंबड्या खाण्यासाठी खुराड्यात शिरला. त्याने २० कोंबड्या फस्त केल्यानंतर तो बाहेर येण्यासाठी निघणार तोच त्याच्या धक्क्याने दरवाजा बंद झाला अन् तो खुराड्यात अडकला.

Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगा मोठा अनर्थ टळला

विठ्ठलनगर येथे बिबट्या आल्याचे समजताच माजी उपसरपंच मनोहर पाटील, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, शरद मसाळ, महेश शेंडगे यांनी कोंबड्यांच्या खुराड्याचा दरवाजा व्यवस्थित बंद करून बाजूला पत्रा तसेच लाकूड लावले. जेणेकरून तो बाहेर येणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळे बिबट्याला पकडणे सोपे झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.