पुणे - ‘निवडणूक आयोग व उच्च न्यायालयच राजकीय आरक्षणाची रचना ठरवतात. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या दबावाने एससी आरक्षण बदलणे शक्य नाही. तरीही एससी आरक्षणाच्या वादावर महाविकास आघाडीतील काही नेते जाणूनबुजून दलित समाजात संभ्रम निर्माण करून जातीय तेढ वाढवत असल्याचा आरोप रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे नेते राहुल डंबाळे यांनी पत्रकाद्वारे केला.
प्रभाग क्र. २४ कमला नेहरू हॉस्पिटल रस्ता पेठ परिसरात माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यावर हेतुपुरस्सर आरोप लावून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गलिच्छ राजकारणाला अनुसूचित जाती समाज व आंबेडकरी जनता कडाडून विरोध करेल, असा इशारा देतानाच प्रभाग रचनेतील अन्यायकारक तरतुदींवर आक्षेप नोंदवून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्यात यावी, तसेच कर्नाटकमध्ये घेतलेल्या निर्णयाचा दाखला देत महाराष्ट्रातही हा निर्णय तातडीने लागू करण्याची मागणीही त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात आरक्षण बंधनकारक आहे. निवडणूक आयोग व उच्च न्यायालयच राजकीय आरक्षणाची रचना ठरवतात. ते कोणत्याही पक्षाच्या दबावाने ठरविले जात नाही. त्यामुळे निवडणुकीतील एससी आरक्षण बदलणे शक्य नाही, हे माहिती असूनही महाविकास आघाडीकडून खोटा प्रचार केला जात आहे,’ असे त्यांनी नमूद केले.