91702
‘एमएसएटी’ ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त
हेमंत मोर्ये ः बांदा नाबर हायस्कूलमध्ये अभियंता दिन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘इंजिनियरींग डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अभियंता हेमंत मोर्ये यांनी एम.एस.ए.टी. विभाग हा एक स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरत आहे, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रतीक्षा शिरोडकर, पर्यवेक्षक रसिका वाटवे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
श्री. मोर्ये पुढे म्हणाले, ‘‘२१ व्या शतकात तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. विद्यार्थ्यांना या बदलत्या युगाशी जुळवून घेण्यासाठी प्रात्यक्षिक ज्ञानाची नितांत आवश्यकता आहे. एम.एस.ए.टी. विभागात विद्यार्थी प्रत्यक्ष हाताने काम करून शिकत असतो. त्यामुळे त्यांची आकलनशक्ती वृद्धिंगत होत असते.’’
यावेळी मोर्ये यांनी काँक्रिट, आर.सी.सी. कॉलम, काँक्रिटचे प्रकार, बांधकामाच्या विविध पद्धती आदी विषयांवर सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. या विभागातून मिळणारे प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असेही ते म्हणाले. मुख्याध्यापिका देसाई यांनी विद्यार्थ्यांना ''इंजिनिअरिंग डे''च्या शुभेच्छा देऊन तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी व प्रगतीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी एम.एस.ए.टी. विभागाचे समन्वयक राकेश परब, निदेशक भूषण सावंत, निदेशिका गायत्री देसाई, रिया देसाई उपस्थित होते. गायत्री देसाई यांनी आभार मानले.