सॅम कॉन्स्टासचा आक्रमक पवित्रा, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाला झोडत ठोकलं शतक
GH News September 16, 2025 09:18 PM

भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए संघात अनऑफिशियल कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सुरुवात केली. भारताच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. पहिल्या विकेटसाठी सॅम कॉन्स्टास आणि कॅम्पबेल केल्लावे यांनी 198 धावांची भागीदारी केली. सॅम कॉन्स्टासने दमदार शतकी खेळी केली. त्याने 114 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकार मारत 109 धावा केल्या. कॉन्स्टासने 80पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने शतक ठोकलं. त्याने भारतीय भूमीवर पहिलं शतक ठोकलं आहे. पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करत त्याने आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. त्याच्या खेळीमुळे या सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला आहे. 

सॅम कॉन्स्टासवर गेल्या काही दिवसांपासून टीका होत होती. त्याची खेळी त्यासाठी कारणीभूत ठरली. वेस्ट इंडिज दौऱ्यात सॅम कॉन्स्टास पूर्णपणे फेल गेला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील 3 सामन्यात अर्धशतक सोडा, त्याला 30 धावाही करता आल्या नाहीत. इतकंच काय तर दोन वेळा खातं न खोलता तंबूत परतावं लागलं होतं. पण तरीही ऑस्ट्रेलिया निवड समितीला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्याला पुन्हा संधी दिली आहे.

सॅम कॉन्स्टास सध्या 19 वर्षांचा असून भारताविरूद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक ठोकत लक्ष वेधून घेतलं होतं. सॅम कॉन्स्टास ऑस्ट्रेलियासाठी पाच कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 16.30 च्या सरासरीने 163 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड खूपच निराशाजनक आहे. त्याने 20 फर्स्ट क्लास सामन्यात 30.34 च्या सरासरीने 1062 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 73 षटकं खेळली आणि 5 गडी गमवून 337 धावा केल्या. लियाम स्कॉट नाबाद 47 आणि जोश फिलिप नाबाद 3 धावांवर खेळत आहे. भारताकडून हर्ष दुबेने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर खलील अहमद आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पाच गडी झटपट बाद करण्याचं आव्हान असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.