Shivajirao Chothe : राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षबदल करताना दिसत आहेत. दरम्यान, आता जालन्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलाच धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. शिवाजीरावच चोथे यांच्या या निर्णयानंतर आता जालना जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आज (16 सप्टेंबर) जाहीर प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी अजित पवार हेदेखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात शिवाजीरावर चोथे यांनी राष्ट्रवादीची घडी मनगटावर बांधली. या पक्षप्रवेशानंतर शिवाजीरावांचा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव हा नक्कीच जनकल्याणाच्या कार्यात उपयोगी पडेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच मी त्यांच्यासह सर्वांचं मनापासून स्वागत करतो, असे म्हणत अजित पवार यांनी शिवाजीराव चोथे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिवाजीराव चोथे यांचे जालना जिल्ह्यात चांगलेच वजन आहे. गेली चार दशकं त्यांनी जालना जिल्ह्यात शिवसेनेचे काम केले होते. मात्र त्यांनी वैयक्तिक कारण देत चोथे यांनी ठाकरेंकडे पक्षाच्या जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आपले (उद्धव ठाकरे) प्रेम गेली 40 वर्षे लाभले. मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी बाळासाहेब ठाकरे, आपण तसेच मातोश्रीबद्दल माझ्या मनात कायम आदर असेल, असे चोथे यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटले होते. चोथे यांच्या राजीनाम्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार, याची चर्चा रंगली होती. ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जातील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र आता त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात कोणती जबाबदारी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवाजीराव चोथे यांनी चाळीस वर्षे शिवसेनेचे काम केले. 1995 साली त्यांनी पहिल्यांदा अंबड विधानसभा मतदारसंघातून आमदरकीची निवडणूक जिंकली. त्यानंतर 1999, 2004 साली त्यांना पक्षाने तिकीट दिले होते. मात्र ते या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. सध्या ते जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी आहेत. तसेच ते स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचेही अध्यक्ष आहेत. अंबड नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमनपदही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात त्यांचे वेगळे वजन आहे. शिवाजीराव चोथे राष्ट्रवादीत आल्यामुळे आता अजित पवार यांना त्याचा काय फायदा होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.