BMC Election 2025 : लिहून घ्या..रेकॉर्ड करा…काहीही झालं तरी मुंबईवर…महापौरपदावर फडणवीसांचं मोठं विधान!
GH News September 16, 2025 11:18 PM

Devendra Fadanvis : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीत मुंबई पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. काहीही झालं तरी आम्हीच मुंबई जिंकणार, असा विश्वास प्रत्येकाकडून व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी माझे विधान रेकॉर्ड करा, काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचंच सरकार येणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस आज मुंबईत भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाला फडणवीस यांच्यासोबतच भाजपाचे इतरही महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ठाकरे मुंबईच्या विकासावर बोलत नाहीत. त्यांच्याकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीच नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

व्हिडीओ रेकॉर्ड करा, जपून ठेवा

तसेच पुढे बोलताना त्यांनी महायुतीवरही भाष्य केलं. त्यांनी माध्यमांना उद्देशून आज माझे शब्द लिहून घ्या. व्हिडीओ रेकॉर्ड करा. तो जपून ठेवा आणि नंतर सगळीकडे दखवा की काहीही झालं तरी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. काहीही झालं तरी मुंबई पालिकेवर महायुतीचंच सरकार येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आम्ही धारावीच्या दहा लाख लोकांना…

मुंबईच्या गिरणगावात राहणारा मराठी माणूस आज वसई विरार, कर्जतकडे फेकला गेला आहे. आम्ही मात्र बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला. म्हाडाच्या माध्यमातून मराठी माणसाला हक्काचे घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्यांच्या हाती मुंबईची सत्ता होती त्यांना स्वप्नही बघता येत नव्हते आणि लोकांचे स्वप्नही पूर्ण करता येत नव्हते, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे यांना टोला लगावला. मुंबईतील धारावी प्रकल्पावरही त्यांनी भाष्य केले. आम्ही धारावीच्या दहा लाख लोकांना घर देत आहोत. या सर्व लोकांना धारावीतच घर देण्यात येणार आहे. प्रत्येकाला घर देणारा आमचा हा प्रकल्प आहे, असे सांगत त्यांनी आमचे सरकार मुंबईच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.