आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानची स्थिती नाजूक आहे. युएई विरुद्धचा सामना गमावला तर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागणार आहे. दुसरीकडे, अँडी पायक्रॉफ्ट यांची तक्रार करून पाकिस्तानला तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. हँडशेक प्रकरणावर आयसीसीआयकडे तक्रार केली. यात पायक्रॉफ्टने दोन्ही संघांना हँडशेक करण्यास मनाई केल्याची ठपका ठेवण्यात आला होता. पण आयसीसीने या तक्रारीला भीकघातली नाही. उलट अँडी पायक्रॉफ्ट यांना क्लिनचीट दिली आहे. त्यात पाकिस्तानी मीडियात या प्रकरणी बरीच चर्चा रंगली होती. जर अँडी पायक्रॉफ्टची हकालपट्टी केली नाही तर पाकिस्तान ते सामनाधिकारी असलेल्या सामन्यात खेळणार नाही. पाकिस्तानचा पुढचा सामना युएईसोबत 17 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट आहेत. त्यामुळे पाकिस्तान या सामन्यावर बहिष्कार टाकेल असं सांगण्यात येत होतं. पण तसं करणं महागात पडू शकते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या संघाला आशिया कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्यास सांगणार नाही. पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पाकिस्तानचा संघ आशिया कप स्पर्धेत खेळला नाही तर जय शाह यांच्या नेतृत्त्वातील आयसीसी त्यांच्यावर मोठा दंड ठोठावू शकते. पाकिस्तानला हे आर्थिक नुकसान परवडणारं नाही. कारण पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान आणि नंतर स्टेडियम दुरूस्त करण्यास खूपच पैसा खर्च केला आहे. त्यामुळे पीसीबीची आर्थिक स्थिती नाजूक आहे.
पाकिस्तान आणि युएई यांच्यातील पुढचा सामना 17 सप्टेंबरला होत आहे. हा सामना पाकिस्तानने जिंकला तर पुन्हा एकदा सुपर 4 फेरीत भारत पाकिस्तान लढत होईल. हा सामना 21 सप्टेंबरला होईल. या सामन्यातही भारतीय संघाचा तसाच पवित्रा असणार आहे. दुसरीकडे, भारत पाकिस्तान संघ आयसीसी अकादमीत सराव करत आहेत. पण दोन्ही संघांच्या सरावाची वेळ वेगवेगळी आहे. पण एक तास तरी एकत्र दिसतील. भारताची सरावाची वेळ संध्याकाळी 6 ते रात्री 9 आहे. तर पाकिस्तानचा संघ रात्री 8 ते रात्री 11 पर्यंत सराव करणार आहे.