Ozone Layer : कार्बनचा 'विक्रमी' उच्चांक: ओझोन थराचा धोका वाढला!
esakal September 17, 2025 04:45 PM

नाशिक: जागतिक औद्योगीकरणाच्या धोरणात कार्बनडाय ऑक्साइडच्या प्रमाणात वाढ होत आहे. मे २०२५ मध्ये वातावरणातील कार्बनचे सरासरी प्रमाण ४३०.५ भाग प्रतिदशलक्ष या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. हे प्रमाण ओझोन थराच्या रक्षणासाठी धोकादायक असून, मानवासाठी जीवनावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाच्या नियंत्रणावर तातडीने उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

वाढत्या औद्योगीकरणामुळे कार्बनडाय ऑक्साईडच्या प्रमाण झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रदूषण त भर पडली आहे. त्याचा थेट परिणाम पृथ्वीभोवतीच्या ओझोन थरावर होत आहे. अशा परिस्थितीमध्ये तापमान वाढीसह पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. परिणामी गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, दुष्काळ, समुद्राच्या पातळीत वाढ होणे, पुर येणे, कमी वेळेत ढगफुटीसदृश्य पाऊस पडणे अशा नैसर्गिक आपत्तींना मानवाला तोंड द्यावे लागत आहे.

दरम्यान, एका अभ्यासानुसार सन १९७९ ते २०२१ या कालावधीमध्ये कार्बनचे प्रमाण ८० भागांनी वाढले आहे. वाढलेले हे प्रमाण भविष्याच्या दृष्टीने मानवासाठी धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे वेळीच धोका ओळखून कार्बन उत्सर्जन नियंत्रणासाठी ओझोनचे रक्षण आवश्यक आहे.

जागतिक पातळीवर ओझोनचे महत्त्व लक्षात घेता यंदाच्या वर्षी ‘जीवनासाठी ओझोन ही ओझोन दिनाची थीम आहे. या माध्यमातून पृथ्वीसाठी ओझोन थराचे महत्त्व अधोरेखित केले आले. त्यादृष्टीने कार्बनच्या वाढत्या नियंत्रणाला आळा घालण्यासाठी सर्वप्रथम विविध रसायनांचा वापर नियंत्रित करणे गरजेचे आहे. तसेच वाढत्या शहरीकरणासह वाहनांची वाढलेली संख्या आणि वापरही कार्बन उत्सर्जनासाठी कारणीभूत ठरतो आहे. त्याचा थेट परिणाम ओझोनच्या थरावर होत आहे. हे चित्र बदलायचे असल्यास वाहनांपासून निर्माण होणाऱ्या वायु प्रदूषणावरही काम व्हायला हवे.

ओझोन थराचे महत्त्व

ओ 3 रेणूंनी बनलेला ओझोन थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १०-३० किलोमीटरवर खालच्या पातळीवर पसरलेला असतो. त्याची मुख्य भूमिका सूर्याच्या सर्वात हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांना शोषून घेताना त्याला अवरोधित करणे आहे. त्यामुळे हे पृथ्वीसाठी एक कवच आहे. हे कवचच नष्ट झाल्यास सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कामुळे त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू आणि इतर आजारांचे प्रमाण वाढू शकते. तसेच वनस्पती आणि सागरी जीवनावर गंभीर परिणाम होणार आहे.

Bike Taxi Fare: इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा आजपासून सुरू, पाहा किती असणार भाडे?

१९९४ पासून ओझोन दिन

जागतिक स्तरावर युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीचे सन 1994 मध्ये 16 सप्टेंबर हा ओझोन थर जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस घोषित केला. सन 1987 मध्ये ओझोन थर नष्ट करणाऱ्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केल्याच्या तारखेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.