टीम इंडिया सध्या यूएईमध्ये सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप 2025 स्पर्धेत खेळत आहे. टीम इंडिया या स्पर्धेनंतर रेड बॉल क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. टीम इंडिया नुकतीच इंग्लंड दौऱ्यावर जाऊन आली. भारताने या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी केली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध दोन हात करणार आहे. टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील एकूण दुसरी तर मायदेशातील पहिली कसोटी मालिका असणार आहे. या मालिकेत एकूण 2 कसोटी सामने होणार आहेत. उभयसंघात 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने मंगळवारी 16 सप्टेंबरला या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. विंडीज क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. रॉस्टन चेज विंडीजचं नेतृत्व करणार आहे. तर जोमेल वॉर्रिकन याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देणयात आली आहे.
निवड समितीने माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज क्रेग ब्रैथवेट याचा पत्ता कट केला आहे. क्रेगला तब्बल 12 वर्षांनंतर संघातून वगळण्यात आलं आहे.
निवड समितीने पहिल्यांदाच 22 वर्षीय फिरकीपटू खैरी पीयर याला संधी दिली आहे. तसेच एलिक अथानाजे याला संधी दिली आहे. तसेच माजी आणि दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल याचा मुलगा टॅगनारायण याचाही समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान विंडीजनंतर बीसीसीआय निवड समिती या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. शुबमन गिल याची कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका असणार आहे. तसेच निवड समिती करुण नायर याला इंग्लंड दौऱ्यानंतर पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात संधी देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
विंडीज कसोटी मालिकेसाठी सज्ज, 15 खेळाडूंची निवड
पहिला सामना, 2 ते 6 ऑक्टोबर, अहमदाबाद.
दुसरा सामना, 10 ते 14 ऑक्टोबर, नवी दिल्ली.
टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट टीम : रॉस्टन चेज (कॅप्टन), जोमेल वॉर्रिकन (उपकर्णधार), केवलॉन एंडरसन, एलिक अथानजे, जॉन कॅम्पबेल, तेजनरेन चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्स, शाई होप, टेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, शमार जोसफ, ब्रँडन किंग, एंडरसन फिलिप, खारी पिएर आणि जेडन सील्स.