IND W vs AUS W : भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मंधाना जबरदस्त फॉर्मात आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी तिचा हा फॉर्म टीम इंडियासाठी जमेची बाजू ठरणार आहे. असं असताना स्मृती मंधानाने पुन्हा एकदा जबरदस्त खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यात तिचा आक्रमक अंदाज दिसून आला. तिने गोलंदाजांना धू धू धुतलं. इतकंच काय तर पहिल्या विकेटसाठी प्रतीक्षा रावलसोबत अर्धशतकी भागीदारी देखील केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने शतक ठोकत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. स्मृती मंधानाने तिच्या क्रिकेट कारकिर्दीतील हे 12वं शतक ठोकलं आहे. तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्स आणि इंग्लंडच्या टॅमी ब्यूमोंट यांच्याशी बरोबरी केली. एकदिवसीय शतके करणाऱ्यांच्या यादीत मंधाना संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्या पुढे फक्त मेग लॅनिंग (15) आणि बेट्स (13) या दोघी आहेत. स्मृती मंधानाची कामगिरी अशीच सुरु राहिली तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नक्कीच ती या दोघांचा विक्रम मोडीत काढेल. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत तिच्याकडून क्रीडाप्रेमींना फार अपेक्षा आहेत.
मंधानाचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सर्वात जलद शतक आहे.स्मृती मंधानाने फक्त 77 चेंडूत शतक ठोकलं. भारतीय महिला फलंदाजाकडून ठोकलेलं दुसरे सर्वात जलद शतक आहे. भारतीय फलंदाजाकडून सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही साउथपॉच्या नावावर आहे. तिने आयर्लंडविरुद्ध 70 चेंडूत हा विक्रम केला होता. 47 पेक्षा अधिक सरासरीने 4700 पेक्षा जास्त धावा काढणारी मंधाना सर्व महिला सलामीवीरांमध्ये धावांच्या बाबतीत बेट्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, मंधाना या सामन्यात 91 चेंडू खेळली आणि 14 चौकार आणि 4 षटकार मारून 117 धावा करून बाद झाली. तहिला मॅकग्राथच्या गोलंदाजीवर एशले गार्डनरने तिचा झेल घेतला.
जूनमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी20 मालिकेत मंधानाने तिचे पहिले टी20 शतक झळकावलं होतं. त्यामुळे महिला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारी पहिली भारतीय ठरली. दुसरीकडे, मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.