Qatar vs Israel : इस्रायल विरुद्ध 55 मुस्लिम देश आले एकत्र, पण दोन शेजाऱ्यांनीच कतरला दिला झटका
GH News September 17, 2025 07:15 PM

कतरची राजधानी दोहा येथे सोमवारी अरब लीग आणि ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) यांनी संयुक्त इमर्जन्सी परिषद बोलावली होती. यात 55 मुस्लिम देश इस्रायल विरोधात एकत्र आले. त्यांनी इस्रायलने कतरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्याचा निषेध केला. बैठकीत पाकिस्तान, तुर्की, अजरबैजान आणि सौदी अरेबिया हे मोठे देश सुद्धा होते. सर्वांनी मिळून इस्रायलवर हल्ल्याचा आरोप केला आणि कतरसोबत एकजुटीने उभे असल्याच सांगितलं. पण या ऐतिहासिक बैठकीत कतरचे दोन महत्वाचे शेजारी यूएई आणि बहरीनच्या थंड प्रतिक्रियेने सगळ्यांनाच चक्रावून सोडलं.

मागच्या आठवड्यात इस्रायलने कतरची राजधानी दोहा येथे जवळपास 10 हवाई हल्ले केले होते. हमासच्या सिनिअर नेत्यांना लक्ष्य करण्याच्या इराद्याने हे हल्ले करण्यात आले. गाझा युद्धविरामाच्या प्रस्तावावर चर्चा करणारे हे नेते होते. या हल्ल्यात सहाजणांचा मृत्यू झाला. या कारवाईवरुन अरब आणि मुस्लिम देशांमध्ये नाराजीची भावना आहे. परिषदेत मुस्लिम राष्ट्रानी ही अभूतपूर्व आक्रमकता असल्याच म्हटलं. कतरवरील हल्ला हा मुस्लिम विश्वाला आव्हान देण्यासारख आहे.

कतरसाठी मोठा झटका

बैठकीत सहभागी झालेल्या 55 मुस्लिम देशांनी इस्रायलला इशारा दिला. अशा हल्ल्यानी फक्त क्षेत्रीय शांतताच धोक्यात येणार नाही, तर परिस्थिती अजून चिघळू शकते. पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया आणि मलेशिया सारख्या देशांनी जाहीरपणे कतरच समर्थन केलं. पण यूएई आणि बहरीनने आपल्या सर्वोच्च नेत्यांना पाठवण्याऐवजी सामान्य प्रतिनिधी पाठवले. शेजारी असून त्यांची ही भूमिका कतरसाठी मोठा झटका मानली जात आहे.

त्यांच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो

इस्रायल सोबत अब्राहम करारानंतर यूएई आणि बहरीनचे संबंध त्यांच्याशी सामान्य झाले आहेत. अशावेळी त्यांनी जाहीरपणे इस्रायल विरोधात उभं राहण टाळलं.कतर दीर्घ काळापासून क्षेत्रीय राजकारणात मुस्लिम विश्वातील मजबूत चेहरा म्हणून स्वत:ला सादर करत आहे. पण शेजारी देशांकडून अर्धवट समर्थनामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.