येरमाळा - बीड जिल्ह्यातील भुकणवाडी(ता.गेवराई) येथील उपसरपंच गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड या कला केंद्रातील नर्तिकेच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील तुळजाई कला केंद्र विनापरवाना सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. संबंधित कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
१७ सप्टेंबर मराठावाडा मुक्ती संग्राम दीनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्ह्याचा दौऱ्यावर असताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना जिल्ह्यात विनापरवाना, कलाकेंद्राच्या आडून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या कला केंद्रांचे परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्ह्याधिकऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील कला केंद्रांच्या आडून विनापरवाना देशी, विदेशी दारु विक्री,वेश्याव्यवसाय चालविले जात असल्याचे, सर्वसामान्यातून बोलले जात असल्याने अशा कला केंद्रावर गैरप्रकार होत असतील तर त्यांचे परवाने रद्द करून कायमस्वरूपी बंद करण्याची कार्यवाही तात्काळ करा असे ही पालक मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार,जिल्हा पोलिस अधीक्षक शपकत आमना प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी बैठकीला उपास्थित होते.
कळंब तालुक्यातील सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर चोराखळी येथे दोन, तर वडगाव (ज.) येथे एक कला केंद्र सुरू आहे. याशिवाय नव्याने पाच कला केंद्रांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल आहेत.
मात्र कला केंद्राच्या आडून विनापरवाना दारू विक्री, बनावट देशी-विदेशी दारू तयार करणे, वेश्या व्यवसाय यांसारखे गंभीर गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सर्व कला केंद्रांचे परवाने रद्द करून कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी जिल्ह्यातून जोर धरत आहे.
दरम्यान, चोराखळी येथील कला केंद्रात गेल्या महिन्यात झालेला गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे प्रकरण पोलिसांनी दडपल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला असून, या भागातील कला केंद्रे पोलिसांच्या आशीर्वादाने नियम तोडून रात्रभर सुरू असल्याचेही प्रकार कांही स्थानिकांनी पोलिसांना सांगुनही कलाकेंद्र बंद असल्याचे गस्त पाथकाचे पोलिस सांगत होते. त्यांनी चला आत जाऊन बघू चालु आहेत का नाही अशा चर्चेचा स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या संभाषणाचा व्हिडीओ गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.