भाजपकडून ‘मराठी दांडिया’चे आयोजन
मुलुंड, ता. १६ (बातमीदार) ः मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या नवरात्रोत्सवात भाजपकडून शहरभरात मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठीबहुल भागांमध्ये रंगणारा हा दांडिया आता चौथ्या वर्षी विक्रोळीतील कन्नमवार नगरातील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर साजरा होणार आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या पाच दिवसांत दररोज सायंकाळी ७ वाजता हा उत्सव सुरू होईल. कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते सादरीकरण करणार असून, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार दररोज उपस्थित राहतील. सर्वांसाठी प्रवेश मोफत असून, यूट्युबवर थेट प्रक्षेपणाची सुविधाही उपलब्ध असेल. दररोज सुमारे २५ हजार प्रेक्षक सहभागी होतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. उत्कृष्ट दांडिया सादर करणाऱ्या तिघांना आयफोन देऊन गौरवण्यात येणार आहे. यंदाच्या कार्यक्रमाची खास थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ असून, त्यामुळे सोहळ्याला विशेष आकर्षण लाभणार असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले. मराठी संस्कृतीचा जल्लोष अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक आणि मुलुंडचे आमदार व भाजप प्रदेश कोषाध्यक्ष मिहीर कोटेचा यांनी केले.