सुपोषित भारत संकल्पना राबविणार
एक लाख १० हजार ६२९ अंगणवाडी केंद्रांमध्ये साजरा होणार राष्ट्रीय पोषण माह
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागामार्फत १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत सुपोषित भारत संकल्पनेनुसार राज्यातील एकूण एक लाख १० हजार ६२९ अंगणवाडी केंद्रांमध्ये विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली.
सुपोषित भारत संकल्पनेस अनुसरून राष्ट्रीय पातळीवर पोषण अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांचे आरोग्य व पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील २५ लाख ८२ हजार ३३० बालके, तीन वर्षे ते सहा वर्षे वयोगटातील २४ लाख ७४ हजार ४१७ बालके, तर चार लाख ३२ हजार २३४ गरोदर महिला, एक लाख ६० हजार किशोरवयीन मुली आणि चार लाख २३ हजार ७५६ स्तनदा माता या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती आयुक्त कैलास पगारे यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महिला व बालविकास विभागाचे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते बुधवारी (ता. १७) या कार्यक्रमचे उद्घाटन झाले आहे. या कार्यक्रमात बाळाचे पहिले सुवर्णमयी एक हजार दिवस या सचित्र पुस्तीकेचे प्रकाशन आणि नवनियुक्ती मुख्यसेविका आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांना नियुक्तिपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
सहा संकल्पना निश्चित
या कार्यक्रमामध्ये लठ्ठपणा कमी करणे, बालपणाची काळजी आणि शिक्षण/पोषण, अर्भक व बालक आहार पद्धती, पुरुष सहभाग, स्थानिक सक्षमीकरण व स्वावलंबन, एकत्रित कृती व डिजिटायझेशन या सहा संकल्पना निश्चित करून दिल्या आहेत.
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान
याशिवाय आरोग्य विभागाच्या सहकार्याने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या अभियानअंतर्गत राज्यातील अंगणवाडी परिक्षेत्रातील महिलांची आरोग्य तपासणी शिबिरामध्ये करण्यात येणार असल्याचे पगारे यांनी सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रीय पोषण माह कालावधीत पाच तज्ज्ञांच्या वेबिनारचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.