Pimpri News : गतिरोधक उभारले, मात्र पांढऱ्या पट्ट्याविना; महिंद्रा कंपनीजवळील प्रकार, अपघाताचा धोका
esakal September 18, 2025 07:45 AM

पिंपरी : राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रशासनाने महिंद्रा कंपनी प्रवेशद्वार क्रमांक एक ते जामदार वस्ती या दीड किलोमीटर अंतरात तीन ठिकाणी गतिरोधक उभारले आहेत. पण, त्यावर पांढरे पट्टे मारण्यास प्रशासनाला विसर पडला आहे. रात्रीच्यावेळेस गतिरोधक दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

एमआयडीसी प्रशासनाकडून चाकण परिसरातील इंड्युरन्स कंपनी चौक ते इंद्रायणी नदी या साडेचार किमीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर ७.५ मीटरच्या दोन मार्गिका तयार करण्यात येत आहेत. जून २०२४ मध्ये या कामाला सुरुवात झाली; पण हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. हे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.

पण, सव्वा वर्ष झाले तरी अजूनही एका बाजूचेही काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. परिणामी, नागरिकांना प्रचंड मनः स्ताप सहन करावा लागत आहे. महिंद्रा कंपनी गेट नंबर एक ते जामदार वस्ती दीड किलोमीटर काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे. दीड किलोमीटर अंतरातच तीन ठिकाणी गतिरोधक उभारले असून प्रशासन आणखी काही गतिरोधक उभारण्याच्या तयारीत आहे.

पण, गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारायला प्रशासन विसरले. परिणामी, रात्रीच्या वेळेस गतिरोधक दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने आवश्यक तेथेच गतिरोधक ठेवून चुकीच्या पद्धतीने उभारलेले बाकीचे गतिरोधक काढून टाकावेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन अपघाताचा धोकाही टळेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

एमआयडीसी प्रशासनाने जागोजागी गतिरोधक टाकण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने गतिरोधक टाकताना वाहतुकीवर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, तसेच त्यावर पांढरे पट्टे मारावेत. त्यामुळे वाहनचालकांचे अपघातही टळतील.

- किशोर महाडिक, वाहनचालक

अनावश्यक छेद रस्ते नकोत

इंड्युरन्स कंपनी चौक ते इंद्रायणी नदीपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्ये दुभाजक टाकले जात आहेत; पण एमआयडीसी प्रशासनाने अनेक ठिकाणी दुभाजक टाकले नसून छेद रस्ते काढले आहेत. परिणामी, वाहने वळण घेण्यासाठी या रस्त्यांचा वापर करत असल्याने वाहतूक संथ होत आहे. प्रशासनाने अनावश्यक ठिकाणी छेद रस्ते काढू नयेत, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.