महाडीबीटी पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त
esakal September 18, 2025 02:45 PM

काटेवाडी, ता. १७ ः महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. मात्र, शेतकऱ्यांना या पोर्टलवरील सततच्या तांत्रिक समस्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कागदपत्रे अपलोड न होणे, छाननी प्रक्रियेत विलंब, पेमेंट फाइल्स डाउनलोडच्या तक्रारी आणि आधार क्रमांक अद्ययावत करण्याच्या सुविधेचा अभाव आदी अडचणी शेतकऱ्यांसमोर येत आहेत.
महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ‘सादर करणे निरंक’ असा संदेश दिसतो. काही शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्ययावत न झाल्याने ही समस्या उद्भवत आहे. यापैकी काही अर्जांचे निराकरण झाले असले तरी ‘बीएफएफएलवाय’ प्रक्रियेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना ग्राहक सेवा केंद्रांवर वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.

छाननी प्रक्रियेत विलंब
पोर्टलवर अपलोड केलेली कागदपत्रे छाननीसाठी उघडण्यास वेळ लागत आहे. काही कागदपत्रे अस्पष्ट दिसत असून, अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठीही बराच वेळ लागतो. यातच सत्र मध्येच बंद होत असल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प होत आहे. यावर उपाय म्हणून सर्व्हर क्षमता वाढवण्यात आली असली तरी, अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधा सध्या बंद आहे.

पेमेंट प्रक्रियेतही अडचणी
कृषी यांत्रिकीकरण योजनांसाठी पेमेंट फाइल्स डाउनलोड करून घेण्यासाठी उपलब्ध असल्या तरी ‘पेमेंट इन प्रोसेस’मध्ये शेतकऱ्यांची नावे दिसत नाहीत. पुणे जिल्ह्यातील तालुका आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या लॉगिनवर फाइल्स उपलब्ध असल्याचे दिसले, तरी त्यावर प्रतिसाद सादर करण्यात अडचणी येत आहेत. नॉन-आधार प्रोफाइल असलेल्या शेतकऱ्यांना आधार क्रमांक अपडेट करण्याची सुविधा नसल्याने कागदपत्रे अपलोड करताना ‘निरंक’ असा संदेश येत आहे.

पोर्टलवरील तांत्रिक समस्यांबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहोत. लवकरच यावर तोडगा निघेल. महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड न झाल्यास त्वरित Grievance पर्यायाद्वारे तक्रार नोंदवा. लॉगिन करून Grievance/Helpdesk मध्ये समस्या (उदा. कागदपत्र अपलोड अडचण) सविस्तर नमूद करा. यामुळे तांत्रिक समस्यांचे त्वरित निराकरण होईल, अर्ज छाननी प्रक्रियेत पुढे जाईल आणि शासकीय योजनांचे अनुदान वेळेत मिळेल. या तक्रारीचा रेफरन्स नंबर जपून ठेववा, यामुळे पाठपुरावा सोपा होईल. स्थानिक तालुका कृषी कार्यालयात मार्गदर्शनासाठी भेट द्या.
- सचिन हाके,
तालुका कृषी अधिकारी, बारामती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.