राजगुरुनगर, ता. १६ : राज्यातील ज्या भागात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्या भागात शंभर अद्ययावत कांदाचाळी उभारणार असल्याची घोषणा, पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केल्याची माहिती खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी दिली. कांदा निर्जलीकरण करून साठविण्याच्या संकल्पनेवर सरकारचे काम सुरू असल्याचेही रावल यांनी सांगितले.
कांद्याच्या भावाच्या आणि साठवणुकीच्या संदर्भातील समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी राज्यातील कांदा उत्पादक भागातील बाजार समितींच्या सभापतींबरोबर मंगळवारी (ता. १६) झालेल्या ऑनलाइन बैठकीत रावल यांनी ही घोषणा केली. चांगला बाजारभाव मिळावा या अपेक्षेने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चार सहा महिने कांदा साठवून ठेवला आहे. पण बाजारभाव सुधारणे दूरच, मात्र साठवणुकीचा ताण शेतकऱ्यांवर येत असून कांदा खराब होण्याची टांगती तलवार कायम डोक्यावर आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा, निर्यातीवरील निर्बंध शिथिल व्हावेत यांसह अन्य समस्यांवर चर्चा करण्यासाठी रावल यांनी ही ऑनलाइन बैठक आयोजित केली होती.
खेड बाजार समितीचे सभापती शिंदे यांनी या बैठकीत अनेक मुद्दे मांडले. कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा साठवून ठेवत आहेत. परंतु निर्यातीवरील निर्बंधांमुळे बांगलादेश, श्रीलंका आणि अन्य बाजारपेठांत कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. कांदा विकला तर शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो आणि साठवला तर कांदा खराब होण्याची भीती वाटते. नवा कांदा बाजारात येण्यापूर्वीच साठवलेला कांदा विकला गेला नाही, तर परिस्थिती बिकट होईल. म्हणून दसरा-दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निर्यातीवरील बंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना कांदाचाळीसाठी अनुदान मिळावे, अशी मागणी शिंदे यांनी केली.
सभापतींच्या मागणीला प्रतिसाद देताना पणनमंत्र्यांनी राज्यातील कांदा उत्पादन होत असलेल्या भागात शंभर सुसज्ज कांदाचाळी उभारण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा खराब होऊ नये, यासाठी सरकार स्तरावर प्राधान्याने पाठपुरावा करू, असे ते म्हणाले.
‘निर्जलीकरण कराण्यावर सरकार विचार’
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या कांद्याला स्पर्धात्मक बाजारभाव मिळण्यासाठी बाजार समित्यांनी कांद्याचे ग्रेडिंग व ब्रँडिंग करण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात आणण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला रावल यांनी दिला. कांदा निर्जलीकरण करून पावडर स्वरूपात साठविण्याच्या संकल्पनेवर सरकार विचार करीत असून शेतकरी गटांना यामध्ये सहभागी करून घेऊन प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा विचार सुरू आहे असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली