नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शांतता समितीची बैठक
esakal September 18, 2025 02:45 PM

नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शांतता समितीची बैठक
शहरातील समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासह नागरिकांना आवाहन
मुरूड, ता. १७ (बातमीदार) ः मुरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ६३ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी देवीची प्रतिष्ठापना करताना नियमांचे काटेकोर पालन करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन मुरूड पोलिस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांनी केले. येथील शांतता समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी सर्व नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, कारवाईची वेळ येऊ देऊ नये, अशी विनंती केली.
या बैठकीस तहसीलदार आदेश डफळ, नायब तहसीलदार संजय तवर, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश रसळे, मुख्याधिकारी सचिन बच्छाव, कनिष्ठ अभियंता रोशन पाटील, माजी नगरसेवक अविनाश दांडेकर, श्रीकांत सुर्वे, राशीद फहीम, नांदगाव सरपंच सेजल घुमकर, डॉ. विश्वास चव्हाण, नयन कार्णिक, मनोहर मकू यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि शांतता समिती सदस्य उपस्थित होते. गणेशोत्सव अत्यंत शांततेत पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त करताना आगामी नवरात्रोत्सवातील काही महत्त्वाच्या समस्यांवर समिती सदस्यांनी चर्चा केली. मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून मोकाट जनावरांवर कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. अलीकडे सवतकड्याची दरड कोसळल्यामुळे गढूळ पाणीपुरवठा झाल्याचे मान्य केले, मात्र पाणी प्रदूषित नसल्याचे स्पष्ट केले. तहसीलदार आदेश डफळ यांनी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत पार पाडल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले व शांतता प्रस्थापित केली तरच आपण प्रगती करू शकतो, असा संदेश दिला. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश रसळे यांनी नवरात्रोत्सवातील चलतचित्र वा देखाव्यांमुळे कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना केली. उत्सव गणेशोत्सवाप्रमाणेच शांततेत व गुण्यागोविंदाने पार पाडावा, अशा आशयाचा एकमताने संदेश देत बैठकीचा समारोप करण्यात आला.
.............
वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी
विशेषतः मुरूड बाजारपेठेतील वाहतूक कोंडी, भाजीविक्रेत्यांचा व रिक्षांचा अनधिकृत थांबा, उनाड गुरे-घोड्यांचा संचार, मोकाट कुत्र्यांची समस्या, मिरवणुकीत डीजेचा अवास्तव आवाज व अश्लील गाणी, रस्त्यांची दुर्दशा, पालिकेचे गढूळ पाणी आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा या विषयांवर उपाययोजना करण्याची मागणी झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.