पुणे : बालगंधर्व रंगमंदिर येथे रसिक प्रेक्षकांना, कलाकारांना पुरेसे पार्किंग मिळणे अपेक्षित आहे; पण या पार्किंगमध्ये थेट घोले रस्त्यावरील एका हॉटेल व्यावसायिकाने ठेकेदाराला हाताशी धरून ग्राहकांच्या गाड्यांची व्यवस्था केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला असून, हॉटेलचा कर्मचारी आम्ही पार्किंग विकत घेतले असल्याचा दावा करत आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे नाटक, लावणी यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. तसेच राजकीय, सामाजिक कार्यक्रमांमुळेही बालगंधर्व रंगमंदिर हाउसफुल्ल होते. येथील कार्यक्रमासाठी शेकडो नागरिक येतात. त्यांची दुचाकी व चारचाकी वाहने लावण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात जागा उपलब्ध आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून हे पार्किंग मोफत होते; पण गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिकेने एका बांधकाम व्यावसायिकास या पार्किंगचा ठेका दिला आहे. त्यामध्ये नागरिकांना सशुल्क पार्किंग सेवा दिली जात आहे. हे पार्किंग बालगंधर्व रंगमंदिरात येणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे; पण घोले रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या चारचाकी या ठिकाणी लावल्या जात आहेत.
बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम नसला तरी पार्किंगमध्ये कायम गाड्या लागलेल्या दिसून येतात, तर कार्यक्रम असताना बाहेरच्या गाड्या लावलेल्या असल्याने नागरिकांना, कलाकारांनी, नाट्य संस्थांच्या बस लावण्यास जागा उपलब्ध नसते.
याच संदर्भात समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल झाला असून हॉटेलमधील कर्मचारी कार घेऊन जात असल्याचे समोर आले. त्याला काही नागरिकांनी कार पार्किंगबद्दल विचारले असता हे हॉटेलचे पार्किंग आहे. हॉटेलने पार्किंग विकत घेतले आहे, कागदपत्र पाहिजे असेल तर हॉटेलवर जा, असे सांगत आहे. दरम्यान, याच वेळी नाटकाची गाडी पार्किंगमधून बाहेर काढण्यास सांगितले आहे अशी तक्रार नागरिकाकडून केली जात आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचे पार्किंग गेले काही वर्षे मोफत होते. ते काही महिन्यांपूर्वीच ठेकेदाराला चालविण्यासाठी दिले आहे. याठिकाणी हॉटेलचे पार्किंग होत असल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे. याप्रकरणी ठेकेदारास नोटीस बजावली असून, त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्यास हा ठेका रद्द केला जाईल.
- सुनील बल्लाळ, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग, पुणे महापालिका
पादचाऱ्यांची तारेवरची कसरत
बालगंधर्व रंगमंदिर येथे दुचाकी पार्किंगच्या रस्त्यात पावसाचे पाणी साचते. त्यामुळे दुचाकी लावून बाहेर येणाऱ्या किंवा दुचाकी घेण्यासाठी पार्किंगमध्ये येणाऱ्या नागरिकांना निसरड्या कठड्यावर चढून त्यावरून चालत जावे लागत आहे. ही समस्या दिसत असूनही नाट्यगृह प्रशासन व ठेकेदार यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.