पिंपरी : चिखलीतील एका सराफाच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा रावण टोळीचा कट पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने उधळून लावला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे
आलिशान मोटारीतून आलेल्या दरोडेखोरांना पिस्तूल, कोयता अशी घातक शस्त्रे बाळगली होती. अनिरुद्ध ऊर्फ बाळ्या ऊर्फ विकी जाधव (२८, रावेत), अभिषेक ऊर्फ बकासुर पवार (२२, चिंचवड), यश ऊर्फ गोंद्या खंडागळे (२१, निगडी), शुभम चव्हाण (३०, आकुर्डी), प्रद्युम्न जवळगे (२५, चाकण), सोहन चंदेलिया (२३, रावेत) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोड्याच्या तयारीत असलेले दोघेजण मोटारीच्या बाहेर थांबून पाहणी करत होते. इतर सातजण दुसऱ्या मोटारीत बसून होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन मोटारी, पिस्तूल, जिवंत काडतूस, कोयता, अन्य वस्तू असा एकूण १५ लाख २५ हजार ९७४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी अनिरुद्ध जाधव याच्यावर पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे. त्या गुन्ह्यात तो फरार होता. त्याच्यावर खुनासाठी अपहरण, दरोडा, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे असे दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. यश खंडाळे याच्यावर निगडी पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका गुन्ह्यात तो फरार होता. सोहन चंदेलिया याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.