अंबरनाथ, ता. १८ (वार्ताहर) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी (ता. १९) अंबरनाथ शहरात आगमन करणार आहेत. शिवमंदिर रोडवरील खेर सेक्शन येथील मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर हुतात्मा चौकाजवळील पनवेलकर हॉलमध्ये राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
आगामी पालिका निवडणुकीची रणनीती, उद्धव ठाकरे यांच्यासोबतची संभाव्य युती, तसेच नुकतेच शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांबाबतही ते भाष्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे अंबरनाथमधील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या जंगी स्वागतासाठी तयारीला लागले आहेत. यासंदर्भात बुधवारी सायंकाळी मनसे नेते राजू पाटील यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. तसेच गुरुवारी रात्री मनसे नेते अविनाश जाधव हे अंबरनाथमध्ये येऊन तयारीचा आढावा घेणार आहेत. नुकतेच अंबरनाथमधील मनसेचे तीन नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर प्रथमच राज ठाकरे अंबरनाथमध्ये दाखल होत असल्याने त्यांच्या भाषणाकडे आणि भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.