खल्वायनची संगीत मैफल रंगली
esakal September 19, 2025 12:45 PM

-rat१७p७.jpg-
२५N९२१०८
रत्नागिरी ः खल्वायन संस्थेच्या मैफलीत गाताना मुग्धा भट-सामंत. शेजारी साथसंगत हेरंब जोगळेकर, श्रीरंग जोगळेकर, मंगेश चव्हाण, हर्ष बोंडाळे, सार्था गवाणकर व सानिका लिंगायत.
----
संगीत रसिकांना भावली स्मृती मैफल
मुग्धा भट-सामंतांचा कार्यक्रम ; जोगळेकर कुटुंबीयांची साथसंगत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः खल्वायन-रत्नागिरी या संस्थेची मासिक संगीत मैफल येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात (कै.) अन्नपूर्णा ऊर्फ गोदूताई अनंत जोगळेकर स्मृती मैफल म्हणून साजरी झाली. रत्नागिरीच्या प्रसिद्ध गायिका मुग्धा भट-सामंत यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच नाट्य, भक्तिगीतांच्या सुमधूर स्वरांनी मैफल रंगतदार झाली.
रंगकर्मी प्रदीप तेंडुलकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते कलाकारांना सन्मानित करण्यात आले. मैफलीची सुरुवात मुग्धा भट-सामंत यांनी बिहागडा रागातील विलंबित तिलवाडा तालात निबद्ध असलेल्या ‘ऐ मन मोहलिया’ या बंदिशीने केली. याला जोडून द्रुत तीन तालातील ‘अब दे रंग दे ही’ बंदिशीनंतर राग-केदारमधील मध्यलय झपतालातील ‘मालनिया सजचली’ ही बंदिश व याला जोडून द्रुत तीन तालातील ‘सय्या मोरा रे’ ही बंदिश सादर केली. दुर्गामाता भवानीदेवी या १३ रागांचे मिश्रण असलेल्या रागमालेच्या सादरीकरणातून त्यांनी आपले शास्त्रीय गायनातील प्रभुत्व सिद्ध केले. मैफलीच्या उत्तरार्धात मुग्धा सामंत यांनी भासे मनात राया, प्रीती सुरी दुधारी, प्रियाघे निजांकी जाता ही नाट्यपदे, एक दादरा त्यानंतर योगिया दुर्लभ हा अभंग व शेवटी श्रीपाद वल्लभ दिगंबरा या भैरवीतील अभंगाने त्यांनी मैफलीची सांगता केली. या मैफलीला साथसंगत, तबला-हेरंब जोगळेकर, हार्मोनियम-श्रीरंग जोगळेकर, पखवाज-मंगेश चव्हाण, तालवाद्य साथ-हर्ष बोंडाळे, तानपुरासाथ-सार्था गवाणकर व सानिका लिंगायत यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.