आपटाळे, ता. १८ : ‘‘ज्या दिवशी महिलांचा विकास होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल, त्याकरिता महिला सशक्तीकरणासाठी प्रोत्साहन द्यावे. महिलांच्या हाती ग्रंथ, पुस्तके, तंत्रज्ञान द्यावे, वर्तमानपत्रे वाचनाची सवय लावावी. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. आज न्यायाधीश म्हणून महिलांची संख्या अधिक आहे. महिलांचा विकास हाच समाजाचा विकास आहे,’’ असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश एस. एस. जैन यांनी केले.
कुसूर (ता. जुन्नर) येथे बुधवारी (ता. १७) तालुका विधी सेवा समिती जुन्नर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे व जुन्नर तालुका बार असोसिएशन यांच्या वतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी जैन बोलत होत्या. यावेळी नालसा अंतर्गत मुलांसाठी कायदेशीर सेवा योजना २०२४, या विषयावर ॲड. रणजित भगत, समाजातील महिलांचे स्वातंत्र्य आणि गोपनीयता या विषयावर ॲड. स्वाती दुराफे, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य व नालसा पोर्टलची व्यापक माहिती व कायदेशीर मदत या विषयावर ॲड. हेमंत हडवळे, पोस्को कायद्याबद्दल जागरूकता या विषयावर ॲड. निलीमा शेरकर, तसेच अल्पवयीन मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देणे या विषयावर ॲड. प्रगती शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रकाश ताजणे, जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवदास तांबे, उपाध्यक्ष ॲड. अजीज खान, पंचायत समिती कृषी अधिकारी नीलेश बुधवंत, ॲड. प्रगती शिंदे, न्यायालयीन कर्मचारी प्रशांत मोरतळे, जालिंदर शिंगोटे, सरपंच दत्तात्रेय ताजणे, उपसरपंच रामदास काळे, तान्हाजी दुराफे, ग्रामसेवक प्रदिप खिलारी आदी उपस्थित होते.