शिरगाव, ता. १९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिवसानिमित्त शिरगाव येथील आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालयात निबंध लेखन व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सूचनेनुसार आयोजित उपक्रमात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मोदी यांचे जीवनकार्य, नेतृत्वगुण व देशाच्या विकासातील योगदान व भारताचे भविष्य यावर निबंध सादर केले. चित्रकला स्पर्धेत विविध कल्पक व आकर्षक चित्रकृती विद्यार्थ्यांनी साकारल्या. हा उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश फरताडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कला शिक्षक डॉ. हनुमान सुरनर यांनी चित्रकला स्पर्धा तर मराठी विषयाचे अध्यापक रामभाऊ घुगे यांनी निबंध लेखन स्पर्धेचे नियोजन केले.
स्पर्धेचे परीक्षण शाळेतील शिक्षकांनी केले. बद्रीनारायण पाटील, विनायक गायकवाड, किरण धादवड, राधेश्याम वारे, साकेत कारंजकर, राहुल होवाळ आदींचे सहकार्य लाभले. यात प्रथम क्रमांक देवयानी वैभव कुंभार आठवी, द्वितीय क्रमांक
स्वरा देवरे आठवी आणि तृतीय क्रमांक श्रुती निषाद नववी यांनी पटकावला.तर निबंध स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे आहेत. प्रथम लीशा कुमावत नववी, द्वितीय प्रतीक्षा भोकटे दहावी, तृतीय नेहा गराडे आठवी. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखनकौशल्य, सृजनशीलता आणि राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल जागरूकता निर्माण झाल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
शाळेत अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांचे लेखन आणि कला कौशल्य विकसित होण्यास मदत होते आणि त्यांचे विचार प्रकट करण्याची एक प्रकारची संधी यानिमित्ताने त्यांना उपलब्ध होते.
- रमेश फरताडे, मुख्याध्यापक