देव तारी त्याला कोण मारी... वगैरे वाक्यं आपण नेहमीच ऐकत असतो. जीवन-मृत्यूची कारणं त्याची शक्यता आपण विज्ञान किंवा दैवावर ढकलतो.
इथं आपलंच काही चालत नाही असं म्हणतो, पण उत्तर प्रदेशातल्या एका घटनेने सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
स्त्री अर्भक हत्येच्या प्रयत्नाचं हे प्रकरण आता चर्चेत आलं आहे.
उत्तर प्रदेशातील एका गावात आपल्या शेळ्यांना चरायला घेऊन गेलेल्या माणसाला एका बाळाचा रडण्याचा आवाज येत होता.
आवाजाच्या दिशेने तो गेला तेव्हा त्याला त्या क्षीण आवाजाबरोबर एक हातही मातीतून बाहेर आलेला दिसला. मातीच्या ढिगाऱ्यातला तो हलणारा हात आणि तो आवाज याची कल्पना त्यानं तात्काळ इतर गावकऱ्यांना दिली.
पाठोपाठ पोलिसांनाही हे कळवलं गेलं. त्यांनी या बाळाला मातीतून बाहेर काढलं. हे बाळ म्हणजे 20 दिवसांची एक मुलगी होती.
ही घटना उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर जिल्ह्यात घडली असून या बाळावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे प्रकरण स्त्री भ्रूण हत्येचं असावं असा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला नाही. पण तरी भारतात स्त्री भ्रूण हत्येचा इतिहास फार जुना आहे. यामुळंच स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरही घसरलं. या वस्तुस्थितीकडं दुर्लक्ष करता येणार नाही.
शहाजहानपूरच्या सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश कुमार यांनी बीबीसीला अधिक माहिती दिली.
ते म्हणाले की, "या बाळाला सोमवारी 15 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात आणले गेले. ते पूर्णपणे घाणीने माखलेलं होतं. बाळाच्या तोंडात आणि नाकपुड्यांत चिखल गेला होता."
"ती चिमुकली अत्यंत गंभीर अवस्थेत होती. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर दिसणारी लक्षणं दिसत होती. अनेक किटकांनी आणि प्राण्यांनी तिला चावे घेतल्याचं दिसत होते."
"24 तासांनी आम्हाला तिच्यात थोडी सुधारणा दिसली. मात्र तिची स्थिती आधीच खालावलेली असल्याने तिला संसर्गही झालेला आहे."
डॉ. कुमार म्हणाले, "या बाळाला पुरल्यावर ते लगेच सापडलं असावं, कारण तिच्या जखमा अजून ताज्या होत्या."
तिचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्लास्टिक सर्जनसह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे असंही त्यांनी सांगितलं.
डॉ. राजेश कुमार म्हणाले की, "तिची अवस्था गंभीर असली तरी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत."
पोलिसांनी या मुलीचे पालक शोधत असल्याचं सांगितलं आहे. राज्याच्या चाइल्ड हेल्पलाइनलाही या बाळाबद्दल कळवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
अशाप्रकारे अर्भकाला मृत्यूच्या दारात लोटण्याचं शहाजहानपूरमधलं हे पहिलं प्रकरण नाही.
2019 मध्ये एका बाळाला माठामध्ये ठेवून जिवंत पुरण्याची घटना घडली होती. काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते बाळ वाचलं.
भारतामधील घसरलेल्या लिंग गुणोत्तराची चर्चा होत असते. मुख्यत्वे गरीब समुदायांमध्ये महिलांकडे आर्थिक ताणाचं कारण अशा नजरेनं पाहिलं जातं. त्यामुळे त्यांच्याशी भेदभाव होतो.
मुलगाच पाहिजे या हट्टामुळे लाखो स्त्री भ्रूणांची किंवा मुलींची हत्या झाल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)