राहू, ता. १९ : राहू- दहिटणे (ता. दौंड) रस्त्यावरील सटवायच्या ओढ्याजवळील अज्ञातस्थळी रस्त्याच्या कडेला सात गाईंची वासरे शुक्रवारी (ता. १९) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सोडली आहेत.
साधारणतः दोन ते तीन महिने वयाच्या वासरांना वनविभागाच्या हद्दीत सोडल्याने त्यांच्या जिवाला धोका आहे. या परिसरात बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव आहे. जवळ वन विभागाचे शेकडो एकर घनदाट कुरण आहे. त्यामुळे बिबट्याला आयती शिकार आल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. इतकी लहान वासरे नेमकी या ठिकाणी कोणी सोडली? याबाबत स्थानिक नागरिकांना प्रश्न पडला आहे.
गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे गोपालकांपुढे भाकड जनावरांचा सांभाळ करणे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, की वाढत्या महागाईमुळे दुभती जनावरे सांभाळणे सुद्धा शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. तर भाकड जनावरांची निगा शेतकरी कशी ठेवणार. चाऱ्याची महागाई त्यामुळे भाकड जनावर शेतकऱ्यांना सांभाळणे कठीण बनले आहे.
गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे संकरित वासरे, भाकड जनावरे सांभाळणे मोठे आव्हान आहे. या कायद्यामध्ये बदल करून करावा, अशी मागणी दौंडच्या पश्चिम पट्ट्यातील पशुपालकांकडून होत आहे.
शेतकऱ्यांनी आज्ञातस्थळी लहान वासरे सोडू नये. अशा जनावरांसाठी ग्रामपंचायत स्तरावर उपाययोजना संदर्भात निर्णय घ्यावा. गोशाळांनी या जनावरासंदर्भात पुढाकार घ्यावा. गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे आमच्या पुढे पेच निर्माण झाले आहे.
- डॉ. विकास घोडे, तालुका पशुधन विकास अधिकारी, दौंड
03297