राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सध्या परिस्थिती गंभीर बनली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावे आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची स्थिती बरी नाही. पूर-पावसामुळे शेती वाहून गेली. पंचनाम्यास आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. या आठ दिवसांत 17 शेतकऱ्यांनी व वर्षभरात दोन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लाखो शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत व त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू मावळले आहे. त्यामुळे मिंधे यांचे असे कोणते शेत आहे व त्या शेतात असे काय पिकते की, ज्यामुळे शेतीत काम करून त्यांचा चेहरा टवटवीत होतो? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.
नेते मात्र थापा मारण्यात मग्नशिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. ज्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. गेल्या आठ दिवसांत १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, वर्षभरात ही संख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे. या गंभीर परिस्थितीतही सरकारमधील नेते मात्र थापा मारण्यात आणि जनतेला खोटी आश्वासने देण्यात मग्न आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली.
शेतात काय पिकते ते लोकांना कळू द्यायावेळी सामना अग्रलेखातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मिंधे आणि अजित पवार यांच्यासारखे नेते ठेकेदारीच्या दलालीतून कोट्यधीश आणि अब्जोपती झाले आहेत. त्यामुळे राज्याला कितीही कर्ज झाले किंवा शेतकरी आत्महत्या करत असले, तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. कंटाळा आला की ते हेलिकॉप्टरने शेतावर जातात. थापांचे पीक काढतात आणि इतके टवटवीत होतात की गुलाब पाकळ्यांनाही त्यांच्या टवटवीतपणाचा हेवा वाटावा. मिंधे यांचे शेत पर्यटनासाठी खुले करावे. त्यांच्या शेतात काय पिकते ते लोकांना कळू द्या. त्यांच्या टवटवीत शेतीचे बियाणे लाखो शेतकऱ्यांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे सरकार हे थापेबाजांचे सरकार आहे. मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांत थापा मारण्याची जी स्पर्धा सुरू आहे, ती थक्क करणारी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तर या तिघांच्या थापेबाजीला ऊत आला. मिंधे पालकमंत्री असलेल्या ठाण्यातील अनेक आदिवासी पाडे आजही विकास किरणांच्या प्रतीक्षेत आहेत. मिंधे, अजितदादा, फडणवीस हे याबाबतीत एक से बढकर एक आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लोकांचे जीवन बदलले असा साक्षात्कार या तिघांना काल झाला. मोदी यांनी त्यांच्या काळात असे काय केले की, त्यामुळे लोकांचे जीवन बदलले? महाराष्ट्रासारख्या एकेकाळच्या प्रगत, श्रीमंत राज्यावर आज साडेनऊ लाख कोटींचे कर्ज चढले आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.