सध्या संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये आशिया कप क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान यांच्यासह युएई, हाँगकाँग आणि ओमानचे संघ खेळत आहेत.
भारताने पाकिस्तान आणि युएईला पराभूत केल्यानंतर 19 सप्टेंबरला ओमानवर 21 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने आशिया कपमध्ये विजयाची हॅट्रिक नोंदवली.
असं असलं तरी, जागतिक टी-20 क्रमवारीत 20 व्या स्थानावर असलेल्या ओमानने नंबर वन असलेल्या भारतीय संघाला ज्याप्रकारे आव्हान दिलं, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 188 धावा केल्या, तर ओमानच्या टीमने 20 षटकांत 167 धावांची खेळी केली.
या सामन्यात भारतीय संघाचे 8 फलंदाज माघारी परतले, तर दुसरीकडे भारतीय गोलंदाज ओमानच्या फक्त 4 फलंदाजांनाच बाद करू शकले.
ओमानकडून फलंदाजीला उतरलेल्या आमिर कलीमने 46 चेंडूत 64 धावा केल्या, तर हम्माद मिर्झाने 33 चेंडूत 51 धावांची खेळी केली.
भारताविरुद्ध विजयासाठी 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानच्या संघाने चांगली सुरुवात केली होती.
7 व्या षटकात जतिंदर सिंह आणि आमिर कलीम यांनी धावसंख्या 50 च्या पुढे नेली. 9 व्या षटकात कुलदीप यादवने 32 धावांवर खेळत असलेल्या जतिंदर सिंहला बाद करून ओमानला पहिला धक्का दिला.
यानंतर कलीम आणि हम्माद मिर्झा या दोघांनी मिळून चांगली भागीदाली केली. कलीमने केवळ 38 चेंडूत अर्धशतक झळकावले.
या दोघांची भागीदारी तोडण्यासाठी भारताकडून आठ गोलंदाजांनी प्रयत्न केले. अखेर हर्षित राणाने ही भागीदारी मोडून काढली.
तरीही कलीम आणि हम्माद मिर्झाच्या जोडीने 93 धावा केल्या. दरम्यान, कलीम 64 धावा करून बाद झाला.
ओमानच्या क्रिकेट संघाबद्दल सांगायचे झाल्यास, त्यात भारतीय वंशाचे अनेक खेळाडू आहेत. त्यापैकी चारजण गुजराती आहेत. त्यामुळे भारतातील अनेक क्रिकेटप्रेमींमध्ये ओमानच्या संघाबाबत उत्सुकता दिसून येते.
ओमान क्रिकेट संघाचे नेतृत्व जतिंदर सिंग करतोय, जो मूळचा पंजाबचा असून गेल्या दशकभरापासून ओमानसाठी खेळतोय.
भारतीय क्रिकेटपटू आणि ओमानचे खेळाडूभारतीय खेळाडू पूर्णवेळ क्रिकेटपटू आहेत, म्हणजेच क्रिकेटला ते पूर्णवेळ व्यवसायाप्रमाणे पाहतात. याउलट, ओमान संघातील बहुतेक खेळाडू क्रिकेटबरोबरच इतर कोणत्या ना कोणत्या नोकरीत किंवा व्यवसायात गुंतलेले आहेत.
ओमान संघात समाविष्ट असलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये जतिंदर सिंह व्यतिरिक्त विनायक शुक्ला, आशिष ओडेदरा, समय श्रीवास्तव आणि करण सोनावळे यांचा समावेश आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटूंचंही योगदानमाजी भारतीय क्रिकेटपटू संदीप पाटील आणि अंशुमन गायकवाड हेदेखील एकेकाळी ओमानच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत.
टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, ओमानमध्ये 80 देशांतर्गत क्रिकेट संघ आहेत, ज्यात गुजरातमधील विविध शहरांतून गेलेले सुमारे 140 खेळाडू खेळतात.
यामध्ये विशेषतः पोरबंदर, आनंद, सुरत, वडोदरा आणि अहमदाबादमधील तरुण क्रिकेटपटू ओमानकडून खेळतात. ओमानच्या राष्ट्रीय संघाच्या आतापर्यंतच्या सात कर्णधारांपैकी चार जण गुजराचे राहिले आहेत.
गुजराती खेळाडूंचे वर्चस्वओमानच्या संघात जितेन रामानंदीचा समावेश आहे. तो एकेकाळी गुजरातमध्ये हार्दिक पांड्यासोबत क्रिकेट खेळला होता. शुक्रवारी (19 सप्टेंबर) ओमानकडून भारताविरुद्ध खेळताना जितेन रामानंदीने 4 षटकांमध्ये 33 धावा देत 2 विकेट घेतल्या.
जितेन रामानंदीनं घेतलेली पहिली विकेट 38 धावांवर फलंदाजी करणाऱ्या अभिषेक शर्माची होती आणि तेव्हा भारताची एकूण धावसंख्या 72 होती.
त्यानंतर जितेन रामानंदीने 18 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माला कव्हर फिल्डरने झेलबाद केले. त्यावेळी भारताची धावसंख्या 176 होती.
रामानंदीने हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगलाही धावबाद केलं.
फलंदाजी करताना जितेन रामानंदीनं 5 चेंडूत 3 चौकार मारत 12 धावांची नाबाद खेळी केली.
रामानंदी एकेकाळी बडोदा संघातील अष्टपैलू खेळाडू होता.
जितेन रामानंदीला त्याचे प्रशिक्षक राकेश पटेल यांनी ओमानला जाण्याची प्रेरणा दिली. राकेश पटेल स्वतः बडोदा संघाचे गोलंदाज राहिले आहेत.
'द टाईम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, जितेन रामानंदी मूळचा नवसारीजवळील एका लहानशा गावातून आला आहे आणि तो बडोदा अंडर-19 संघाकडून खेळला आहे.
आर्थिक अडचणींमुळे रामानंदी 2019 मध्ये ओमानला गेला आणि नंतर तिथल्या क्रिकेट संघात दाखल झाला.
ओमानच्या संघात जुनागडमध्ये जन्मलेला आशिष ओडेदरा देखील आहे.
यापूर्वी गुजरातमधील अजय लालचेता, राजेश कुमार रणपारा आणि कश्यप प्रजापती हे देखील ओमान संघाकडून खेळले आहेत.
कश्यप प्रजापतीचा जन्म खेडा जिल्ह्यात झाला. तो उजवा फलंदाज आणि गोलंदाज आहे.
अजय लालचेताचा जन्म पोरबंदरमध्ये झाला. तो डावखुरा फलंदाज आणि फिरकी गोलंदाज आहे. तो ओमानसाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. तो सौराष्ट्राच्या अंडर-16 आणि अंडर-19 संघांसाठी देखील खेळला आहे.
राजेश रणपारा मूळचा पालनपूरचा आहे.
ओमान क्रिकेटचे 'गॉडफादर'ओमान क्रिकेटवर भारतीय, विशेषतः गुजराती लोकांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. ओमानच्या राजघराण्याच्या पाठिंब्याने 1979 मध्ये 'ओमान क्रिकेट'ची स्थापना झाली. तेव्हा भारतीय वंशाचे उद्योगपती कनाक्षी खिमजी यांना त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
कच्छमधील मांडवी या किनारपट्टीवरील शहरातील रहिवासी असलेले कनाक्षी गोकलदास खिमजी 1970 च्या दशकात ओमानला गेले आणि त्यांनी तिथे क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
त्यांना प्रवासी भारतीय पुरस्कारही मिळाला. तो पुरस्कार मिळवणारे ते आखाती भागातील पहिले भारतीय ठरले.
कनकसी खिमजी यांचे योगदानकनकसी खिमजी हे एक उद्योगपती होते ज्यांना 'जगातील पहिले हिंदू शेख' ही पदवी देण्यात आली होती.
आजही, अनेक ओमानी लोक त्यांना 'ओमान क्रिकेटचे गॉडफादर' म्हणून ओळखतात. त्यांचा मुलगा पंकज खिमजी सध्या ओमान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालात, पीटर डेला पेना यांनी म्हटलं, "ओमानमधील आधुनिक क्रिकेटच्या इतिहासाची सुरुवात 1970 च्या दशकात झाली. यामध्ये कनकसी खिमजींचा उत्साह आणि मार्गदर्शन हेही महत्त्वाचे घटक होते."
पंकज खिमजी यांनी स्पष्ट केले की, त्यांचे वडील ओमानमध्ये ब्रिटिश नौदल संघांविरुद्ध क्रिकेट खेळत होते आणि ओमानी राजघराण्यालाही क्रिकेटमध्ये रस होता.
त्यांचे कुटुंब बुखातीर लीग सामने पाहण्यासाठी शारजाहला 6 तास कारने प्रवास करून जायचे. कुटुंबाचा मोकळा वेळ क्रिकेटमध्येच जायचा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
2011 मध्ये, आयसीसी डेव्हलपमेंट प्रोग्रामने ओमान क्रिकेटमधील योगदानाबद्दल कनकसी खिमजी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)