Ajit Pawar: वेळ देत नसाल तर खुर्ची सोडा; अजित पवार :'राष्ट्रवादी'च्या मंत्र्यांची कानउघाडणी
esakal September 21, 2025 12:45 AM

नागपूर : ‘‘आपले काही पालकमंत्री फक्त शासकीय कार्यक्रमांनाच संबंधित जिल्ह्यात उपस्थित राहतात. ज्या शहरात जातात तेथील जिल्हाध्याक्षांकडे बघतसुद्धा नाहीत, पदाधिकाऱ्यांसोबत बोलत नाहीत.

पक्षापेक्षा इतर कामांमध्येच ते जास्त व्यग्र असतात. मात्र, यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. तुमच्याकडे वेळ नसेल तर खुर्ची काढून घेतली जाईल,’’ अशा कठोर शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या मंत्र्यांची कानउघाडणी केली.

Latest Maharashtra News Updates Live: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसाचे चिंतन शिबिर शुक्रवारी झाले. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिबिराला कार्याध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे, दत्तात्रेय भरणे आदींसह सर्व आमदार, खासदार, सर्व जिल्हाप्रमुख, विभाग अध्यक्ष आणि राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री, नेते तसेच नेमून दिलेल्या जिल्ह्यात फक्त झेंडा वंदनासाठी जाणाऱ्या पालकमंत्र्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘आता परिस्थिती बदलली आहे. सोशल मीडिया सक्रिय असून तुमच्या बारीकसारीक हालचालींवर सर्वांचे लक्ष असते. मागचे पुढचे संवाद काढून ट्रोल केले जाते. त्यामुळे बदललेल्या काळाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपणही बदललो पाहिजे. पालकमंत्र्यांनी फक्त एक मे, १५ ऑगस्ट व २६ जानेवारीशिवायही जावे.

तेथील आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करावी, लोकांमध्ये फिरावे. त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या.’’ काही मंत्री जातात; मात्र तेथील जिल्हाध्यक्षांना विचारसुद्धा नाही. ते सुद्धा आपल्याच परिवारातील घटक आहेत. असे करून चालणार नाही. आजवर ज्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त कराव्या लागेल. ज्यांना हे जमणार नाही त्यांना खुर्ची रिकामी करावे लागले, असा इशारा त्यांनी दिला.

पवार म्हणाले...

  • - फक्त भाषणे करून चालणार नाही

  • - काही ठोस निर्णय घ्यायचे आहेत

  • - गटचर्चा करून त्यातून नव्या योजना, संकल्पना व धाडसी विचार पुढे आणा

  • - निर्णयाची अंमलबजावणी कालमर्यादेत कशी करता येईल हे बघा

वेळेत न येणाऱ्यांचा समाचार

पवार यांनी पक्षाच्या शिस्तीवरून चिंतन शिबिरात उशिरा येणाऱ्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, की शिबिराची वेळ सकाळी साडेनऊची दिली आहे. त्याचे नियोजन आधीपासूनच केले असताना अनेक जण उशीरा आले. यापुढे बैठका घेताना वेळ संपल्यास सभागृहाचे दरवाजे बंद केले जातील. पक्ष तुम्हाला वर्षातून एक दिवस मागतो. तोसुद्धा तुम्हाला देता येत नसेल तर हे बरोबर नाही.

‘समाजांत तेढ निर्माण करू नका’

म राठा आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. छगन भुजबळ यांनी समता परिषदेचा मेळावा घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकेचे बाण सोडले. त्यांच्या काही वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ‘समाज-समाजांत तेढ निर्माण करू नका’ असा सल्ला भुजबळ यांना दिला. मात्र लगेच, भुजबळ यांना आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगून पाठराखणही केली.

अजित पवार म्हणाले, ‘‘भुजबळ मंत्री या नात्याने महायुती सरकारचा एक भाग आहेत. मात्र, त्यांचा मराठा आरक्षणाबाबतच्या अध्यादेशावर आक्षेप आहे. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणात घुसखोरी सुरू होऊन यामुळे ओबीसींचे नुकसान होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी नोंद आढळल्यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यामुळे ओबीसींचे नुकसान होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितले आहे. यावरही भुजबळांचा आक्षेप आहे. कुठलाही निर्णय घेतला तरी त्यावर दोन मतप्रवाह असतात. रोज नव्या चर्चा घडत आहेत. आरक्षण देताना कायद्याची चौकट पाळली गेली पाहिजे, न्यायालयात टिकले पाहिजे आणि दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशी राज्य सरकारची भूमिका आहे.’’

Maratha Reservation : मागण्या मान्य, उपोषण मागे; हैदराबाद, सातारा गॅझेटची अंमलबजावणी होणार; आंदोलकांचा जल्लोष अप्रत्यक्षपणे असहमती

भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवर बोलताना पवार म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याची मुभा आहे. कुणाला काय हवे हे मागण्याची मोकळीक आहे. मात्र, लोकशाहीमध्ये सर्वानुमते निर्णय झाल्यावर तो मान्य करायचा असतो. आमच्या पक्षाची भूमिका कुठल्याही समाजाला नाराज करायचे नाही अशी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.