92671
मेडिकल कौन्सिलमध्ये ‘होमिओपॅथिक’ नको
इंडियन मेडिकल असोसिएशन; शासन निर्णयाविरोधात निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १९ ः महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय कायद्याला धरून नाही. यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होईल तसेच आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचा दर्जाही खालावेल, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील ५० एमबीबीएस, एमडी व एमएस डॉक्टरांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन शासनाचे लक्ष वेधले. शासनाला पाठविण्यासाठी निवेदनही यावेळी सुपूर्त करण्यात आले. या संदर्भातील ५ सप्टेंबर २०२५ चे शासन परिपत्रक तातडीने रद्द करावे, अशी या निवेदनातील प्रमुख मागणी आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ काल (ता.१८) राज्यभरातील डॉक्टरांनी एक दिवस कामबंद आंदोलन केले. शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर पुढील आठवड्यात मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य मोर्चा आणि बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा आयएमएकडून देण्यात आला आहे.
होमिओपॅथिक डॉक्टर्स आधीच होमिओपॅथी कौन्सिलमध्ये नोंदणीकृत आहेत. त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देणे हा कायद्याचा भंग असून, उच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेचा अवमान आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या कायद्याचेही उल्लंघन होणार असल्याचे नमूद केले. अपुरे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्यास रुग्ण सुरक्षिततेबाबत गंभीर धोका निर्माण होईल, याकडे आयएमएच्या डॉक्टरांनी शासनाचे लक्ष वेधले. उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. विवेक रेडकर आदी उपस्थित होते.