Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या जागेचा प्रश्न पुन्हा अधांतरी; मंत्री महाजनांच्या आश्वासनाचे काय?
esakal September 21, 2025 07:45 AM

नाशिक: तपोवनात साधुग्रामसाठी कायमस्वरूपीऐवजी भाडेतत्त्वावर जागा संपादनाच्या पर्यायावर प्रशासनाने विचार सुरू केला आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी (ता. १९) पार पडलेल्या बैठकीत या पर्यायावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या मुळे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या कायमस्वरूपी जागा अधिग्रहणाच्या आश्वासनाचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

सन २०२६-२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. यंदाच्या सिंहस्थात पाच लाख साधू-महंत उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्यामुळे तपोवनातील साधुग्रामच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी नाशिकमधील तिन्ही आखाड्यांनी केली आहे.

साधुग्रामसाठी ३७७ एकर जागेवर यापूर्वीच आरक्षण टाकण्यात आले असून, त्यापैकी ९४ एकर जागा महापालिकेने संपादितही केली आहे. परंतु, यंदाच्या कुंभात साधू-महंतांची होणारी गर्दी लक्षात घेता साधुग्रामसाठी अतिरिक्त जागेची गरज भासणार आहे.

नाशिकमध्ये २०१५-२०१६ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यावेळी प्रत्यक्षात ३२३ एकर क्षेत्रावर साधुग्राम वसविण्यात आले होते. त्या वेळी तिन्ही आखाडे व त्यांच्याशी संबंधित ११०० खालस्यांचे सुमारे एक लाख साधू-महंत वास्तव्यास होते. मात्र, यंदाच्या कुंभात साधू-महंतांची संख्या वाढणार आहे. त्यातही कुंभमेळा अवघ्या १८ महिन्यांवर येऊन ठेपला असताना साधुग्रामच्या जागेचा प्रश्न आजही कायम आहे. दरम्यान, साधुग्रामच्या ३७७ एकर जागेवर आरक्षण टाकून दहा वर्षांचा कालावधी लोटला आहे.

ही जागा कायमस्वरूपी घेण्यासाठी साधारणत: तीन हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने राज्य शासनाने यासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्री महाजन यांनी दोन दिवसांपूर्वीच नाशिक दौऱ्यात साधुग्रामच्या जागेच्या कायमस्वरूपी अधिग्रहणावर आठ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे घोषित केले होते. मात्र, महाजनांची पाठ फिरताच प्रशासनाने आता भाडेतत्त्वावर जमीन घेण्यासाठीच्या पर्यायावर विचार सुरू केला आहे. त्यामुळे साधुग्रामच्या जागेचा कायमस्वरूपी जागेचा मुद्दा पुन्हा बारगळण्याची शक्यता वाढली आहे.

Cyber Attack on European Airports : मोठी बातमी! युरोपमधील अनेक देशांच्या विमानतळांवर सायबर हल्ला

एक हजार एकर जागा

साधुग्रामसाठी यंदा एक हजार एकर जागेची आवश्यकता भासणार आहे. महापालिकेने यापूर्वी ३७७ एकरवर आरक्षण टाकले आहे. त्यापैकी ९४ एकर संपादित केली आहे. त्याचवेळी गेल्या कुंभमेळ्याप्रसंगी भाडेतत्त्वावर संपादित केलेल्या जागेसाठी सहा लाख आठ हजार रुपये एकर प्रतिवर्ष व जमीन पूर्ववत करण्यासाठी येणारा खर्च पाच लाख रुपये, असे एकत्रित ११ लाख आठ हजार रुपये प्रतिएकर दर शेतकऱ्यांना देण्यात आला होता. त्या वेळी भाडे अदा करण्यासाठी ३५ कोटी ८४ लाख ९३ हजार ८८३ रुपयांचा खर्च झाला होता. यंदा एख हजार एकर जागेचे भाडेतत्त्वावर संपादनासाठी साधारणतः ५०० कोटींच्या निधीची गरज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.