बृज नारायण वेगळ्या पाकिस्तानचे समर्थक होते आणि त्यांनाही तिथंच राहायचं होतं. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि फाळणी झाली, तेव्हा लाहोरमध्ये दंगल सुरू झाली.
त्यावेळी अर्थशास्त्रज्ञ असलेले बृज नारायण निकोलसन रस्त्यावरील त्यांच्या घराबाहेर आले आणि दंगेखोरांना समजावू लागले. 'दुकानं-घरं जाळू नका, कारण आता ही सगळी संपत्ती पाकिस्तानची आहे,' असं ते सांगत होते.
लाहोरमधील प्राध्यापक बृज नारायण हे वसाहतकालीन पंजाबच्या शेती अर्थव्यवस्थेवरील अभ्यासासाठी प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 1888 मध्ये झाला.
फाळणीपूर्वी ते भारताच्या लाहोरमधील सनातन धर्म कॉलेजमध्ये (नंतर एमएओ कॉलेज) अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. पंजाब विद्यापीठाने त्यांना अर्थशास्त्राचे मानद प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं होतं.
डॉ. जी. आर. मदान त्यांच्या 'इकॉनॉमिक थिंकिंग इन इंडिया' या पुस्तकात लिहितात की, फाळणीपूर्वी प्रोफेसर बृज नारायण यांना '20व्या शतकातील आघाडीचे अर्थशास्त्रज्ञ मानलं जात होतं.'
ते पाश्चात्य देशांतील काही विद्यापीठांमध्ये आर्थिक विषयांवर व्याख्यानं देत असत. याच विषयावर त्यांनी 15 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली होती. त्यांचे लेखही अनेक वर्तमानपत्रं आणि मासिकांत प्रसिद्ध झाले होते.
पण जिन्नांच्या 'द्विराष्ट्र सिद्धांताला' (टू नेशन थिअरी) पाठिंबा देणं आणि गांधीजींना विरोध करणं, हेही त्यांच्या लोकप्रियतेचं एक कारण होतं. डॉ. जी. आर. मदान लिहितात की, "प्रोफेसर नारायण यांनी 'गांधीजीं'च्या 'चरखा अर्थशास्त्राला' उघड विरोध केला होता."
'चरखा अर्थशास्त्र' ही महात्मा गांधींची विचारधारा होती. यात स्वदेशी वस्तू, आत्मनिर्भरता म्हणजेच स्वावलंबन आणि ग्रामीण भारताच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देण्यात आला होता.
वेगळ्या पाकिस्तानचे 'कट्टर समर्थक'पत्रकार, लेखक आणि कवी गोपाल मित्तल त्यांच्या 'लाहोर का जो जिक्र किया' या पुस्तकात लिहितात की, पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या स्थिर राहू शकणार नाही आणि त्याचं अस्तित्व धोक्यात येईल, असं बहुतांश अर्थतज्ज्ञ मानत होते.
पण प्रोफेसर बृज नारायण यांनी या नेहमीच या मताला विरोध केला आणि पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसा होऊ शकतो याचे समर्थन करणारे अनेक लेख लिहिले.
स्वीडनमधील पाकिस्तानी संशोधक इश्तियाक अहमद यांनी आपल्या 'द पंजाब बिल्ट, पार्टीशन अँड क्लीन्स्ड: अनरेव्हलिंग द 1947 ट्रॅजेडी थ्रू सिक्रेट ब्रिटीश रिपोर्ट्स अँड फर्स्ट-पर्सन अकाउंट्स' या पुस्तकात 1999 मध्ये दिल्लीत सोम आनंद यांनी केलेल्या एका टिप्पणीचा उल्लेख केला आहे.
त्यात म्हटलं होतं की, "प्रोफेसर बृज नारायण यांनी पाकिस्तानच्या मागणीचं समर्थन केलं आणि पाकिस्तान हे एक व्यवहार्य राष्ट्र ठरेल, असं ठामपणे सांगितलं."
पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी लाहोरच्या मॉडेल टाऊनमध्ये आई-वडिलांसोबत राहणारे सोम आनंद सांगतात की, प्रोफेसर बृज नारायण हे पाकिस्तानच्या विचारांचे 'उत्साही समर्थक' होते.
ते वृत्तपत्रांमध्ये लेख लिहायचे, ज्यात आपल्या अर्थशास्त्राच्या मोठ्या ज्ञानाच्या आधारावर ते सिद्ध करायचे की "पाकिस्तान एक यशस्वी आणि टिकाऊ राष्ट्र होईल. असं म्हटलं जातं की, पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी त्यांना तिथेच राहण्यास सांगितलं होतं, आणि प्रोफेसर बृज नारायण पाकिस्तानच्या सेवेसाठी आपलं आयुष्य समर्पित करायला पूर्णपणे तयार होते."
त्यांचा ठाम विश्वास होता की, 'जिना हे एक असं लोकशाही राष्ट्र उभारू इच्छित होतं, जिथं गैर-मुस्लिमांनाही समान हक्क मिळतील.'
सोम आनंद सांगतात की, "मे 1947 पासून मोठ्या प्रमाणात हिंदू स्थलांतर करू लागले होते आणि 15 ऑगस्टपर्यंत फक्त सुमारे 10 हजार उरले होते. त्यांना वाटत होतं की, परिस्थिती सुधारेल आणि ते पाकिस्तानमध्ये राहू शकतील, कारण त्यांची मुळं तिथेच होती."
"पण जशी रॅडक्लिफ अवॉर्डची (सीमारेषेची) घोषणा झाली, तशी गुन्हेगार टोळ्यांनी हत्या आणि लूटमार सुरू केली. त्यामुळे जिनांच्या धर्मनिरपेक्ष विचारांवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या आशा संपुष्टात आल्या."
तरीही, प्रोफेसर नारायण भूमिकेवर ठाम राहिले आणि म्हणाले की, "पाकिस्तानच त्यांची खरी मातृभूमी आहे, त्यामुळे तिथून जाण्याचं कोणतंही कारण नाही."
'तो काफिर आहे, त्याला ठार मारा'खुशवंत सिंग त्यांच्या 'ट्रुथ, लव्ह अँड अ लिटिल मॅलिस: अॅन ऑटोबायोग्राफी' मध्ये लिहितात की, "लाहोरमध्ये दंगलीची सुरुवात शीख नेते मास्टर तारा सिंग यांनी केली होती. त्यांनी पंजाब विधानसभा भवनाबाहेर नाटकीय पद्धतीने आपल्या पट्ट्यातून एक कृपाण बाहेर काढलं आणि ओरडले, 'पाकिस्तान मुर्दाबाद!"
खुशवंत सिंग त्यावेळी लाहोरमध्ये होते, ते लिहितात की "हे अगदी तेलाने भरलेल्या खोलीला आग लावण्यासारखं होतं. संपूर्ण प्रांतात जातीय दंगली उसळल्या."
पत्रकार, लेखक आणि कवी गोपाल मित्तल यांच्या मते, दंगल नियोजित होती की पसरवली गेली, यावर वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज वर्तवण्यात आले.
ते त्यांचं पुस्तक 'लाहोर का जो जिक्र किया' मध्ये लिहितात की, "हे समजायला अवघड होतं की जर दंगल नियोजित होती, तर पाकिस्तानची मालकी असलेली इतकी दुकानं आणि घरं का जाळली जात होती?
दंगलखोरांनी प्रोफेसर बृज नारायण जेथे राहत होते त्या परिसरावर हल्ला केला, तेव्हा त्यांनी हेच सांगून त्यांना आग लावणं आणि हत्या करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला होता."
संशोधक इश्तियाक अहमद यांनी त्यांच्या पुस्तकात लाहोरमधील दंगलीमध्ये प्रोफेसर नारायण यांची हत्या कशी झाली, हे सांगितलं आहे.
त्यांनी सोम आनंद यांच्या हवाल्याने लिहिलं की, "एक मोठा जमाव ते राहत असलेल्या भागात पोहोचला. हा जमाव हिंदू आणि शीख समुदायाच्या रिकाम्या घरांना जाळत आणि लूटत होते."
"नारायण त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की असे करू नका, कारण ही आता पाकिस्तानची संपत्ती आहे. पहिला गट त्यांचं बोलणं ऐकून शांत झाला आणि तिथून निघून गेला. थोड्या वेळानंतर आणखी काही गुंड आले आणि जाळपोळ व लुटालूट सुरू केली. नारायण पुन्हा त्यांच्याकडे गेले आणि त्यांनाही पुन्हा तेच सांगितलं."
"पण त्यांच्यापैकी एक जण ओरडला: 'हा काफिर आहे, त्याला ठार मारा!'"
यात लिहिलं आहे की, "जमाव त्यांच्यावर तुटून पडला आणि पाकिस्तानच्या कट्टर समर्थकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली."
इतर इतिहासकारांनीही पुस्तकांमध्ये या घटनेबद्दल लिहिलं आहे. 'द कॉफी हाऊस ऑफ लाहोर : अ मेमॉयर 1942-57' मध्ये इतिहासकार के. के. अझीझ लिहितात की, प्रोफेसर बृज नारायण हे एकमेव हिंदू विद्वान होते, जे काँग्रेसच्या दाव्यांना विरोध करत पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राष्ट्र बनेल, असं म्हणत होते. "ते वर्गात, सेमिनारमध्ये आणि सार्वजनिक सभांमध्येही सातत्याने हेच सांगत असत."
के. के. अझिझ लिहितात की, "जेव्हा एक जमाव त्यांच्या घराला आग लावण्याच्या उद्देशाने आला, तेव्हा बृज नारायण गल्लीतील दारात उभे राहिले आणि म्हणाले की, काही दिवसांत ही सर्व घरं पाकिस्तानची संपत्ती होतील आणि त्यांना नुकसान पोहोचवणं म्हणजे प्रत्यक्षात पाकिस्तानला नुकसान पोहोचवणं होईल. त्यांचं बोलणं ऐकून पहिल्यांदा आलेला जमाव आश्वस्त झाला आणि तो पांगला गेला."
"पण थोड्या वेळाने पुन्हा जमाव जमला. यावेळी प्राध्यापक त्यांचं मन वळवू शकले नाहीत. त्यांची हत्या झाली आणि त्यांची लायब्ररी जळून खाक झाली."
कॉलेजची अदला-बदलीगोपाल मित्तल लिहितात की, लाहोरच्या सनातन धर्म कॉलेजचे प्रोफेसर बृज नारायण यांनी पाकिस्तानमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता आणि ते 'मुस्लिम लीगचे कट्टर समर्थक' होते.
गोपाल मित्तल मूळचे पूर्व पंजाबचे होते, पण त्यांनी लाहोरला देखील आपलं घर बनवलं आणि आपला बहुतांश वेळ त्यांनी आपल्या मुस्लिम सहकाऱ्यांसोबतच घालवला.
ते लिहितात की, प्रोफेसर नारायण यांची हत्या "माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. ते माझे शिक्षक होते आणि माझ्या स्वभावाच्या जडणघणीवर त्यांचा मोठा प्रभाव होता."
"आधीच माझं कुटुंब लाहोरमध्ये राहायला तयार नव्हतं, आता माझी पावलंही थरथरायला लागली. जेव्हा अमृतसरकडे जाणारा शेवटचा समूह लाहोरहून निघाला, तेव्हा मीही एका बसमध्ये बसलो.
अमृतसरला पोहोचल्यावर तिथेही जळालेली घरं दिसत होती. लाहोरमध्ये माझ्या कपाळावर हौतात्म्याचा प्रकाश पडला नाही, पण येथे येऊन पश्चातापाचे अश्रू मात्र नक्कीच उमटले."
गोपाल मित्तल लिहितात की, "आलेल्या सर्व लोकांची अवस्था वाईट होती. पण असं वाटत होतं की लुटारूही या लोकांच्या गर्दीत सामील झाले होते. कारण कुणाची ट्रंक गायब होती तर कुणाचं अंथरूण गायब होतं."
गोपाल मित्तल यांच्या मते, 'जर प्रोफेसर बृज नारायण जिवंत असते, तर पाकिस्तानच्या आर्थिक स्थिरतेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असती, पण नियतीला हे मान्य नव्हतं.'
ते लिहितात की, "प्रोफेसर बृज नारायण यांच्या अस्थी त्याचं प्रचंड प्रेम असलेल्या पाकिस्तानमध्येच विसर्जित करण्यात आल्या.
'स्वातंत्र्यानंतर, 1916 मध्ये लाहोरमध्ये स्थापन केलेले सनातन धर्म कॉलेज भारतातील अंबालाला हलवण्यात आलं. तर 1933 मध्ये अमृतसरमध्ये स्थापन केलेलं मुहम्मदन अँग्लो-ओरिएंटल (एमएओ) कॉलेज पाकिस्तानमधील लाहोरमध्ये त्याच इमारतीत स्थानांतरित करण्यात आलं, जिथं प्रोफेसर बृज नारायण शिकवत होते.'
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)