खोडद, ता.२० : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन प्रगत शिक्षण घेता यावे यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ संस्थेच्या सहकार्यातून ६५ इंचांचे दोन इन्ट्रॅक्टिव बोर्ड विद्यालयात कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती खोडद (ता.जुन्नर) येथील महात्मा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा दळवी यांनी दिली.
या इन्ट्रॅक्टिव बोर्डमुळे विद्यार्थ्यांना अत्यंत सहज व सोप्या पद्धतीने अध्ययनासाठी फायदा होणार आहे. इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी हे इन्ट्रॅक्टिव बोर्ड वापरले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे स्पर्धात्मक युगात उपयोग होण्यासाठी संस्था व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला आहे. खोडद गावातील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोरा, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा दळवी व सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.